तंत्रनिकेतनचे ४९ पैकी ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण
By admin | Published: July 7, 2016 05:36 PM2016-07-07T17:36:13+5:302016-07-07T17:36:13+5:30
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. ७ : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विविध समस्यांमुळे आधीच विद्यार्थी जेरीस आलेले असतांना आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या नापास सत्रामुळे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अंतिम वर्षाच्या ४९ विद्यार्थ्यांपैकी अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर पत्रिका तपासणीत घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या ना त्या समस्यांमुळे विद्यार्थी जेरीस आलेले आहेत. गुणवत्तेबाबत देखील महाविद्यालयाने दुर्लक्ष केल्याने येथे प्रवेश घेण्यास देखील विद्यार्थी कचरतात. आता निकालाबाबत महाविद्यालयातील विद्यार्थी संतापले आहेत. अंतिम वर्षाला महाविद्यालयात ४९ विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात तब्बल ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. अवघे १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांनाही जेमतेमच गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुर्नरमुल्यांकनासाठी अर्ज केला असता त्यांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची उत्तर पत्रिकेची झेरॉक्स प्रत देण्यात आली. त्या प्रतमध्ये उत्तर पत्रिकेतील तपासणीची तफावत असल्याचे स्पष्ट झाले. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर पत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर तपासणीमध्ये प्रश्नांचे उत्तर बरोबर असून देखील ते चुकीचे आहे असे दर्शविण्यात आले. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहा गुण मिळतील त्या ठिकाणी त्यांना केवळ एक किंवा दोन गुण दिले आहेत. काही प्रश्नांची उत्तरे देखील तपासण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उत्तर पत्रिकेतील घोळामुळे येथील महाविद्यालयातील जवळपास ३२ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला.