ठाण्यातील ३२ पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 08:25 PM2017-07-18T20:25:49+5:302017-07-18T20:26:36+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील ३२ अंमलदारांना उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे, दि. 18 : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील ३२ अंमलदारांना उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी आता प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांच्यापैकी १४ अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून उर्वरित १८ अधिकाऱ्यांना आहे त्याचठिकाणी पदोन्नतीवर कायम ठेवण्यात आले आहे. बदलीमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अंमलदारांना २६ मे २०१७ रोजी पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडील आदेशाने उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली. त्यानुसार त्यांना ६ जून २०१७ रोजी उपनिरीक्षक पदी तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर सुरुवातीला आहे त्याच ठिकाणी नियुक्ती दिली होती. आता या अधिकाऱ्यांना ठाणे शहर आयुक्तालयाच्या निकडीनुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पदोन्नतीवर बदलीचे आदेश दिले.
या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे कंसात बदलीचे ठिकाण दिले आहे. यात गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनिल चव्हाणके (ठाणेनगर), लक्ष्मण जोरी (नौपाडा), प्रल्हाद भामरे (भिवंडी शहर), मारुती दिघे (निजामपुरा), अशोक माने (भोईवाडा), प्रदीप गायकवाड (मानपाडा), बाबासाहेब मुल्ला (डोंबिवली), बबन आवटे (भिवंडी शहर) आणि दिलीप वीर यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे. तर महेंद्र घाग यांना वाहतूक शाखेतून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बदली मिळाली असून अतिक्रमण विभागाचे रमेश कदम यांना डोंबिवली तर निळकंठ करुणकर यांना टिळकनगर पोलीस ठाणे मिळाले आहे. कल्याणच्या नियंत्रण कक्षातील काशीनाथ चौधरी यांना विष्णूनगर तर भिवंडी नियंत्रण कक्षातील शिवाजी कदम यांना भोईवाडा पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
पुढील १८ अधिकाऱ्यांना आहे त्याचठिकाणी बढतीवर कायम ठेवले आहे. यामध्ये सदाशिव नाठे (विशेष शाखा), नंदकुमार फडतरे (खडकपाडा), प्रमोद दळवी (मुंब्रा), मारुती कोहिनकर (बदलापूर पूर्व), रोहिदास पाटील (टिळकनगर), अप्पाजी सस्ते (ठाणेनगर), रहिम मुलाणी, आत्माराम पाटील (शहर वाहतूक शाखा), किशोर पाटील (शांतीनगर), अरुण उतेकर (मुख्यालय), गोरक्षनाथ वाघ (मध्यवर्ती), रविंद्र पाटील (मानपाडा), विलास नलावडे (कोळसेवाडी), अनिल पाटील (भिवंडी शहर), दिनेश चव्हाण (श्रीनगर) आणि मेहमूद मुलाणी (वागळे इस्टेट) आदींचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.