‘म्हाडा’ची ३२ हजार ७३४ घरे

By admin | Published: January 10, 2017 04:50 AM2017-01-10T04:50:48+5:302017-01-10T04:50:48+5:30

‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून कोकण ‘म्हाडा’ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल

32 thousand 734 houses of MHADA | ‘म्हाडा’ची ३२ हजार ७३४ घरे

‘म्हाडा’ची ३२ हजार ७३४ घरे

Next

नारायण जाधव / ठाणे
‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून कोकण ‘म्हाडा’ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) करिता ठाणे आणि कल्याण तालुक्यात सुमारे ३२ हजार ७३४ घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामावर २९१७ कोटी ७९ लाख ३८ हजार रुपये खर्च होणार असून ३०० ते ४०० चौरस फुटांची घरे असणार आहेत. गायरान जमिनीवर घरे बांधण्यात येणार असून त्या जमिनी सोमवारी महसूल व नविभागाने म्हाडाच्या ताब्यात हस्तांतरीत केल्या.
यापैकी २७ हजार ४९६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर ५२३८ घरे ही अल्प उत्पन्न गटांसाठी राखीव आहेत. कल्याण तालुक्यातील बारवे, खोणी आणि शिरगाव येथे, तर ठाणे तालुक्यातील शीळ परिसरातील भंडार्ली आणि गोठेघर येथे ती बांधण्यात येणार आहेत. शिरगाव वगळता सर्व ठिकाणच्या इमारती स्टील्ट अधिक १४ माळ्यांच्या असणार आहेत. शिरगावच्या इमारती स्टील्ट अधिक सात माळ्यांच्या राहणार आहेत. सध्या घरांची जी जागा निश्चित करण्यात आली आहे, तेथील मातीचे परीक्षण, घरांचे आणि इमारतीचे डिझाइन, आराखडे आणि तत्सम कामांसाठी निविदा मागवल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे, हा हेतू असल्याने घरांच्या किमतीही कमी राहणार आहेत. या योजनेनुसार जितके अनुदान देण्यात येते, तेवढी सूट यातील घरांच्या किमतीतून लाभार्थ्यांस दिली जाणार आहे. निविदा प्रक्रियेचे सोपस्कार झाल्यानंतर घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अथवा जिल्हा नगररचना विभागाने भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर पहिली तीन वर्षे या सर्व इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहील. शिवाय पाणी पंपसेट्स, अग्निशमन उपकरणांचीही त्याने काळजी घ्यावयाची आहे. यामुळे ज्यांना घरांची लॉटरी लागेल, त्यांना पहिल्या तीन वर्षांची चिंता नसेल.

पंतप्रधान आवास योजनेखाली असणारा हा गृहप्रकल्प सध्या केवळ निविदा प्रक्रियेत आहे. तो कधी पूर्ण होईल तसेच त्याची लॉटरी कधी निघेल, हे आताच सांगता येणार नाही. यासंबंधीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.
- वैशाली संदानसिंग, कोकण ‘म्हाडा’, जनसंपर्क अधिकारी

Web Title: 32 thousand 734 houses of MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.