टोल वसुलीतून ३२ गावांना वगळणार
By admin | Published: January 9, 2015 01:28 AM2015-01-09T01:28:08+5:302015-01-09T01:28:08+5:30
खारघर टोलनाक्यावरील टोल वसुलीतून पाच गावांना सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच आणखी ३२ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल,
मुंबई - खारघर टोलनाक्यावरील टोल वसुलीतून पाच गावांना सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच आणखी ३२ गावांना वगळण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ या घोषणेवर आम्ही ठाम आहोत. मात्र एका रात्रीत सर्व प्रश्न सोडवू अशी अपेक्षा करू नका, असे पाटील उद्वेगाने म्हणाले.
खारघर येथील टोल वसुली न्यायालयाच्या आदेशावरून सुरू झाली असून, त्या आदेशाबाबत वरील न्यायालयात दावा दाखल करण्याचा विचार सुरू आहे. मात्र त्यात किती यश मिळेल ते सांगता येत नाही. आणखी ३२ गावांना टोल वसुलीतून सूट दिली जाऊ शकते. याखेरीज मोटारींवरील टोलचा भार अवजड वाहनांवर टाकण्याचा विचार सुरू आहे, असे पाटील म्हणाले. राज्यातील पायाभूत विकासाची २०० कोटी रुपयांच्या खालील खर्चाची कामे यापुढे राज्य सरकार करील, असे पाटील यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
नवे टोल धोरण लवकरच - गडकरी
केंद्र सरकार नवीन टोल धोरण लवकरच जाहीर करणार असल्याने थोडा धीर धरा. त्या धोरणानंतर टोलबाबत तक्रार करण्याची संधी उपलब्ध होणार नाही, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. गोरेगाव येथे एका कार्यक्रमास ते हजर होते. त्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.