१५ जागांसाठी ३३ उमेदवार
By Admin | Published: July 18, 2016 04:09 AM2016-07-18T04:09:33+5:302016-07-18T04:09:33+5:30
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १५ जागा करिता ३३ उमेदवार रिंगणात
पालघर : पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १५ जागा करिता ३३ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी पॅनल विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. शनिवारी आघाडी पॅनलच्या उमेदवारांनी टेंभोड्याच्या पद्मनाभ मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १७ जागांसाठी ३१ जुलै रोजी निवडणूक होत असल्या तरी त्यातील ग्रामपंचायत गटातील इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती या अंतर्गतचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पालघर कृषी विकास सहकार पॅनल बनविले असून या पॅनलविरोधात शिवसेनेचे पॅनल रिंगणात आहे तर भाजपाकडून दोन जागावर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या निवडणुकीत सहकारी संस्थांच्या ११ जागासाठी २४ उमेदवार ग्रामपंचायत अंतर्गत सर्वसाधारण दोन जागांसाठी चार उमेदवार व्यापरी गटातून दोन जागांसाठी पाच उमेदवार असे ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सरकारी संस्थामध्ये सर्वसाधारण सात जागासाठी पंधरा उमेदवार तर अनुसूिचत जाती जमातीच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांचा समावेश आहे. सहकारी संस्था (सर्वसाधारण) गटातून दोन्ही पॅनलने प्रत्येकी सातही जागावर आपले उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवार उभा राहिलेला आहे. शनिवारी कृषी विकास सहकारी पॅनलचे उमेदवारासह आ. विलास तरे बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जि.प. सदस्य दामोदर पाटील, महिलाध्यक्ष नीलम राऊत, नगरसेवक मकरंद पाटील, वीरेन पाटील, अशोक अंबुरे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, सिकंदर शेख, वासुलाल पाटील, चंद्रकांत पाटील, दिनकर नाईक, नागेश पाटील, इ.नी टेंभोड्यामध्ये प्रचाराचा नारळ फोडला. (प्रतिनिधी)
>अपक्षही रिंगणात
महिला राखीव व इतर मागासवर्गीय जागांसाठी सरळ लढत होत असून अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी मात्र दोन्ही पॅनलने एक उमेदवार उभा केला असून एक अपक्षही रिंगणात आहे. तर ग्रामपंचायत गटातही विकास आघाडी पॅनल विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार आहे.