३३ पोलीस उपअधीक्षक करणार जात पडताळणी
By admin | Published: February 10, 2017 02:46 AM2017-02-10T02:46:04+5:302017-02-10T02:46:04+5:30
मुंबईसह दहा शहरांतील महापालिका व २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : मुंबईसह दहा शहरांतील महापालिका व २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचा निपटारा तत्परतेने करण्यासाठी आता राज्यातील ३३ पोलीस उपअधीक्षकांवर समाजकल्याण विभागाच्या अखत्यारितील जात पडताळणीच्या दक्षता पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी तातडीने कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बहुतांश अधिकाऱ्यांना सध्या ते ज्या उपविभागात कार्यरत आहेत, त्याच ठिकाणच्या विभागातील जात पडताळणी दक्षता पथकाचा विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना फारसा लांबचा प्रवास करावा लागणार नसल्याचे गृहविभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
निवडणुकांमध्ये उमेदवाराला संबंधित प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविताना त्या जातीचा दाखला निवडणूक कार्यालयात देणे अत्यावश्यक असते. मात्र, समाजकल्याण विभागात जात पडताळणी विभागाकडे असलेल्या अपुऱ्या पदामुळे समितीकडील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या वर्षी या ठिकाणी असलेली १५ उपअधीक्षकांची पदे पुन्हा पुनरुज्जीवित करण्याबरोबरच आणखी २१ पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यापैकी ३३ ठिकाणी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या निवडणुकांमुळे या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य छाननी व प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही त्वरित होणे आवश्यक असल्याने, रिक्त असलेल्या ३३ पदांवर विविध पोलीस घटकांमध्ये कार्यरत असलेल्या ३३ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकात नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित स्वीकारा, तसेच संबंधित पोलीस घटकप्रमुखांनी त्यांना या विभागाचे काम पाहाण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)