राज्य माहिती आयोगात ३३ हजार प्रकरणे प्रलंबित
By admin | Published: March 14, 2016 02:31 AM2016-03-14T02:31:19+5:302016-03-14T02:31:19+5:30
राज्य माहिती आयोगाच्या संथ कारभाराचा फटका नागरिकांना बसतो आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात सुमारे ३३ हजार प्रकरणे प्रलंबित होती
योगेश पांडे, नागपूर
राज्य माहिती आयोगाच्या संथ कारभाराचा फटका नागरिकांना बसतो आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यात सुमारे ३३ हजार प्रकरणे प्रलंबित होती. मुख्यालय व नागपूर वगळता इतर विभागांमध्ये प्रलंबित अपिल व तक्रारींची संख्या फार जास्त आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे आव्हानच बनले आहे.
प्रशासकीय यंत्रणेवर सर्वसामान्य नागरिकांचे नियंत्रण राहावे, या हेतूने २००५ साली माहितीचा अधिकार अस्तित्वात आला. राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय मिळून एकूण आठ विभाग असून प्रत्येक ठिकाणी माहिती आयुक्तांचे पद आहे.
नाशिक व औरंगाबाद येथील
ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे
नागपूर येथील माहिती आयुक्त
वसंत पाटील यांच्याकडे औरंगाबाद तर पुण्याचे माहिती आयुक्त
रविंद्र जाधव यांच्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०१६ अखेरीस राज्यात एकूण ३२ हजार ९४१ तक्रारी व अपिल प्रलंबित होते. नाशिक व औरंगाबाद या दोन विभागांत एकूण ९ हजार ७७४ प्रकरणे प्रलंबित आहेत.
पुणे माहिती आयुक्तांच्या अंतर्गत सर्वाधिक ७,६७२ प्रकरणे प्रलंबित आहेत. मुख्यालयात केवळ ३२१ तर नागपूरला ८८६ प्रकरणे प्रलंबित असून येथेच कार्यवाहीचा वेग सर्वात जास्त आहे.विभाग प्रलंबित अपिल/तक्रारी
मुख्यालय ३२१
बृहन्मुंबई २,५५७
कोकण ५,०८२
पुणे ७,६७२
औरंगाबाद ३,३६९
नाशिक ६,४०५
नागपूर ८८६
अमरावती ६,६४९
एकूण३२,९४१