३३५ मुला-मुलींनी काढला घरातून पळ
By admin | Published: January 17, 2017 02:50 AM2017-01-17T02:50:59+5:302017-01-17T02:50:59+5:30
२०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
मुंबई : रेल्वे स्थानकांत अनेक अल्पवयीन मुले-मुली रेल्वे पोलिसांना सापडतात. त्याबाबत तक्रार दाखल झालेली असल्याने रेल्वे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आणि त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. २०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील ३३५ मुला-मुलींनी घरातून विविध कारणांस्तव पळ काढला होता, अशी माहिती देण्यात आली.
मुंबईचे आकर्षण, अभ्यासासाठी पालकांचा दबाव, अंतर्गत वादविवाद आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले-मुली घर सोडून मुंबई गाठतात. मुंबई गाठण्यासाठी त्यांच्याकडून ट्रेनने प्रवास करण्यावर भर दिला जातो. मात्र मुंबईत आल्यानंतर आसरा नसल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांतच आपले बस्तान मांडतात. अशा मुला-मुलींचे पालक त्यांचा शोध घेतानाच रेल्वे पोलिसांकडेही तक्रार करतात. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून त्यांचा यशस्वीरीत्या शोध घेतला जातो. २०१६मध्ये मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ५७२ मुले-मुली सापडली. यात ३३५ जणांनी घरातून पळ काढला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर १५ केसेस या अपहरणाच्या, ५९ केसेस या स्थानकात येताच गर्दीत पालकांचा हात सुटल्याच्या आहेत. तसेच १३९ केसेस या बेपत्ता असल्याच्या आहेत. याशिवाय १२ केसेस या तस्करी तर अन्य १२ केसेस या मानवी तस्करीच्या आहेत. (प्रतिनिधी)