राज्यातील 3361 गुरुजींना महिनाभर पगार नाही; आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:13 AM2022-01-19T05:13:40+5:302022-01-19T05:14:13+5:30
गुरुवारपर्यंत शिक्षकांचे वेतन न काढल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे.
मुंबई : अर्धा महिना उलटला तरी डिसेंबरचे वेतन अद्याप न झाल्याने अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी शिक्षक आमदारांसोबत मंत्रालयात ठिय्या मांडला. राज्यातील तब्बल ३३६१ शिक्षक अद्याप वेतन न झाल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत शिक्षकांचे वेतन न काढल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे.
राज्यातील अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांना डिसेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत होत असलेल्या विलंबाची तक्रार केली. शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी सचिवांना तातडीने सूचना देत आंदोलनाची गरज नसल्याचे सांगितले; मात्र वेतनासंदर्भातील शासन आदेश आजच काढावा, यासाठी आमदार विक्रम काळे व सुधीर तांबे यांनी कृती समितीच्या पदाधिकांसह मंत्रालयातच ठाण मांडून बसले, तसेच टेबल टु टेबल पाठपुरावा करत याच आठवड्यात वेतन खात्यावर जमा होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले.
‘सेवा संरक्षणाचा निर्णय तत्काळ घ्या’
सेवासंरक्षण हा विषय लालफीतीत अडकल्यासंदर्भातील विचारणाही यावेळी शिक्षकांकडून करण्यात आली असता, फाइल तयार असून, लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
मात्र सेवा संरक्षणाचा निर्णय तत्काळ न झाल्यास २५ जानेवारीपासून राज्यभर अंदोलन करण्याचा इशारा आमदार व शिक्षकांनी यावेळी शिक्षणमंत्र्यांना दिला.
यावेळी कृती समितीचे संजय डावरे, धनाजी साळुंखे, पुंडलीक रहाटे, गुलाब पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.