वडगावात ३४ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
By admin | Published: June 9, 2017 01:02 AM2017-06-09T01:02:50+5:302017-06-09T01:02:50+5:30
अन्न सुरक्षा विभागाने मावळ तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई करत ३४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा वेगवेगळ्या तीन वाहनांमधून जप्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव मावळ : येथे गुरुवारी अन्न सुरक्षा विभागाने मावळ तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई करत ३४ लाख २० हजार रुपयांचा गुटखा वेगवेगळ्या तीन वाहनांमधून जप्त केला. याबाबत श्रीकांत बाळासाहेब चांदेकर (रा. वडगाव मावळ) या इसमावर कारवाई केली असून, तिन्ही वाहनांच्या चालकांना अटक केली आहे.
गणपत कोकणे म्हणाले, वडगाव येथे एम एच १२ ३४४१ या टेम्पोतून ५ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची पानमसाल्याची ३ हजार ४०० पाकिटे जप्त करण्यात आली. याच वाहनातून पानमसाल्याची छोटी १० हजार पाकिटे (१२ लाख रुपये), सुगंधित तंबाखूची ३ हजार ४०० पाकिटे (१४ लाख ४६ हजार रुपये), तर सुगंधित तंबाखूची १६ ग्रॅमची १० हजार पाकिटे ( ३ लाख रुपये) जप्त करण्यात आली.
एम. एच. १२ सी. एच़ ४४९९ या वाहनामधून पानमसाल्याची १८० ग्रॅम वजनाची १४०० पाकिटे (सुमारे २ लाख ४६ हजार), पानमसाल्याची २६०० छोटी पाकिटे (३ लाख १२ हजार रुपये) सुगंधित तंबाखूची १४०० पाकिटे (६१ हजार ६०० रुपये), ६०० ग्रॅम तंबाखूची २६०० पाकिटे (सुमारे ७८ हजार रुपये) जप्त करण्यात आली. एम. एच. १२ इ. डी ९३६५ या वाहनामधून १८० ग्रॅम वजनाची १२०० पाकिटे (सुमारे २ लाख ११), १२० ग्रॅम वजनाची १४०० पाकिटे (सुमारे १ लाख ६८ हजार), पानमसाल्याची १२०० छोटी पाकिटे (सुमारे ५२ हजार ८०० रुपये) आणि १६ ग्रॅम वजनाची गुटख्याची १४०० पाकिटे (४२ हजार रुपये) जप्त करण्यात आली.
मावळातील कारवाई
अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी गणपत कोकणे, देवानंद वीर, संतोष सावंत, अजित म्हेत्रे व वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांनी ही कारवाई केली.