खामगावच्या व्यापा-याला ३४ लाखांचा गंडा
By admin | Published: June 23, 2016 12:13 AM2016-06-23T00:13:50+5:302016-06-23T00:13:50+5:30
भुईमूग शेंग खरेदी व्यवहारात खामगावातील व्यापा-याची फसवणूक, गुजरातमधील व्यापा-यावर गुन्हा दाखल.
खामगाव (जि. बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी दीपक देशमुख यांना गुजरात येथील एका व्यापार्याने ३४ लाख ५५ हजार ४७५ रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भुईमुग शेंगा खरेदी व्यवहारात ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी गुजरातच्या व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपक देशमुख यांची सुमीत एजन्सी आहे. गुजरातमधील यमुना प्रोटिन्स जाम खंबीरया जि. द्वारकाचे बटूक भयाणी यांनी या एजन्सीमधून १ ते ९ जून २0१६ दरम्यान ५५ क्विंटल भुईमूग शेंगा (किंमत ३४ लाख ५५ हजार ४७५ रुपये) खरेदी केल्या. हा सर्व व्यवहार फोनवर झाला; मात्र ठरलेल्या दिवसात भयाणी याने या व्यवहाराचे पैसे दिले नाही. देशमुख यांनी वारंवार फोन करून पैशाची मागणी केली, तरी पैसे नाही. गेल्या काही दिवसांपासून भयाणी यांचा फोनही बंद येत आहे. यामुळे देशमुख यांनी याबाबत बुधवारी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी व्यापारी बटूक भयाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी तरगुळे हे करीत आहेत.