राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:27 AM2019-05-19T04:27:53+5:302019-05-19T04:27:58+5:30

केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे.

34 percent of all children in the state are deprived of kidney vaccines; 10 percent of children in Mumbai | राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

राज्यभरातील ३४ टक्के नवजात बालक काविळीच्या लसीपासून वंचित; मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश

Next

मुंबई : नवजात बालकांना काविळीची लस देणे गरजेचे असते. केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ टक्के नवजात बालक या लसीकरणापासून वंचित राहिल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील १० टक्के बालकांचा समावेश आहे.


केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार, राज्यात प्रत्येक तीनपैकी एक बालक लसीकरणापासून वंचित आहे, तर मुंबईत प्रत्येक दहा बाळांपैकी एक बाळ लसीकरणापासून वंचित आहे. ग्रामीण भागात ३९ टक्के तर शहरी भागात १० टक्के लोक लसीकरण करून घेत नसल्याचे आढळून आले आहे. अहमदनगरमध्ये ४० हजार ९३३, नाशिकमध्ये ३२ हजार ६०९ आणि ठाण्यात ३१ हजार २९५ बालके या लसीकरणापासून वंचित राहिली आहेत.
काविळीकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यातून लिव्हर सिरोसिस, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. मुंबईत खासगी रु ग्णालये, प्रसूतिगृहे, महापालिका अथवा सरकारी आरोग्यकेंद्रांत ज्या बाळाचा जन्म होईल, त्या बाळांना जन्मल्यानंतर २४ तासांच्या आत काविळीची प्रतिबंधक लस देण्यात येते. खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी अतिरिक्त पैसे आकारणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांना लसीकरणाचा खर्च न परवडणे, लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज आणि सरकारी, खासगी रुग्णालयांत लसींचा तुटवडा ही लसीकरणापासून नवजात बालके वंचित राहण्याची मुख्य कारणे आहेत.


याविषयी, डॉ. संतोष शिनगारे यांनी सांगितले की, गर्भवतींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग होऊ नये, याकरिता काविळीचे लसीकरण करण्यात येते. मात्र, ते बाळालाही करणे आवश्यक आहे. काविळीचा प्रकार असलेल्या हेपेटायटिस ‘बी’चे प्रमाण वाढल्यास सिरोसिस, यकृताचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे जीवितालाही धोका होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, हेपेटायटिस ‘बी’चे विषाणू उपचारानंतर पूर्णपणे नष्ट होत नाहीत, ते परतू शकतात. काही वेळा संपूर्ण जीवनभर उपचार घ्यावे लागतात. हेपेटायटिस ‘बी’पासून वाचण्यासाठी तो होऊ न देणे हाच उपाय आहे. म्हणूनच हेपेटायटिस ‘बी’वरील लस घेणे जास्त फायद्याचे आहे.

Web Title: 34 percent of all children in the state are deprived of kidney vaccines; 10 percent of children in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.