३४ रेशन दुकानदारांनी केला घोटाळा
By admin | Published: December 28, 2015 03:57 AM2015-12-28T03:57:02+5:302015-12-28T03:57:02+5:30
राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी
नाशिक : राज्यातील बहुचर्चित वाडीवऱ्हे येथील रेशन धान्य घोटाळ्यात ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शनिवारी न्यायालयात सांगितले़ घोटाळ्यातील काळा पैसा दडविण्यासाठी तयार करण्यात आलेली आणखी एक कंपनी समोर आली असून, तिच्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही झाले आहेत़
न्यायालयाने तिघा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून, उर्वरित चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ संशयित संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, अरुण घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील व ज्ञानेश्वर घुले यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ विशेष सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात सांगितले की, घोटाळ्यामध्ये ३४ रेशन दुकानदारांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ तसेच या धान्याची गुजरातमध्येही विक्री करण्यात आली असून, बनावट बिले व गाड्यांच्या नंबरप्लेट बदलून वाहतूक केल्याची कागदपत्रेही मिळाली आहेत़
रेशन धान्य अपहारासाठी तयार करण्यात आलेली बनावट बिले कोणी तयार केली, नंबरप्लेट बदलून
किती धान्याची वाहतूक झाली, त्यामधील सहभाग या तपासासाठी संशयितांच्या कोठडीची मागणी मिसर यांनी केली़ घोटाळ्यातील प्रमुख संशयित जितेंद्र ठक्करपर्यंत पोलीस अद्यापही पोहोचू शकलेले नाहीत़ (प्रतिनिधी)