महाडमधील ३४ गावे दरडीच्या छायेत

By Admin | Published: May 21, 2016 03:08 AM2016-05-21T03:08:19+5:302016-05-21T03:08:19+5:30

दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या

34 villages in Mahad, in the shadow of the ravine | महाडमधील ३४ गावे दरडीच्या छायेत

महाडमधील ३४ गावे दरडीच्या छायेत

googlenewsNext


महाड : तालुक्यात जुलै २००५ मध्ये अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
२००५ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यातील दासगांव, जुई, रोहन-वलंग, कोंडीवते या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबाचे संसार बेघर झाले होते. त्यावेळी प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट आदि सेवाभावी संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून रोहन, जुई, कोंडीवते, दासगाव आदिवासीवाडी येथील दरडग्रस्त कुटुंबांना मोफत घरे देण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांना दरडींचा धोका सतावत आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाडमधील ३४ गावांना या दरडींचा धोका असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार दासगाव, नडगाव तर्फे बिरवाडी, रायगडवाडी, मांडले, कोथर्डे, वाकी बुद्रुक, कडसरी, लिंगाणा, सव, चोचिवे,मुठवली, लोअर तुडील, जुई बुद्रुक, कोसबी, कुंबळे, वराठी, खैरे तर्फे तुडील आंबेशिवघर, कुर्लेदंडवाडी, कोथेरी, जंगमवाडी, शिंगरकोड मोरेवाडी, मुमुर्शी, बौध्दवाडी, मुमुर्शी गावठाण, पिंपळकोंड, आंबेनवी, मोहात, सह्याद्रीवाडी (आंबेशिवथर) लोअर तुडील, नामोळी कोंड, पारमाची, माझेरी, आंबीवली पानेरीवाडी, या गावातील २ हजार ५७३ घरांना दरडीचा धोका असून या पार्श्वभूमीवर दोन हजार ५० कुटुंबातील ९ हजार ग्रामस्थांना पावसाळ्यात तीन महिने अन्य ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन आढावा बैठक डॉ. आंबेडकर सभागृहात घेतली. त्यावेळी महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला तहसीलदार संदीप कदम, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, नायब तहसीलदार सचिन गोसावी आदि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागामार्फत दरडग्रस्त गावांतील कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याला स्थानिक ग्रामस्थ किती प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागलेले आहे. यापैकी अनेक धोकादायक ठिकाणची कुटुंबे आपले घर गाव सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
>अधिकाऱ्यांना सूचना
यंदाच्या हंगामात नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे दिल्यामुळे महसूल यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांनी दरडींचा धोका टाळण्यासाठी स्वत:हून स्थलांतरित व्हावे. जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्यात येणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिला आहे.

Web Title: 34 villages in Mahad, in the shadow of the ravine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.