विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:11 PM2021-12-27T12:11:27+5:302021-12-27T12:12:00+5:30
Maharashtra : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तब्बल 35 लोकांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून 2 हजार 300 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. आज बीएमसी कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करणार आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.