६० रुपयांची डाळ चोरणारा ३५ वर्षानंतर जेरबंद
By Admin | Published: October 4, 2016 09:22 PM2016-10-04T21:22:42+5:302016-10-04T21:22:42+5:30
अकोला रेल्वे स्थानकावरून जात असलेल्या एका मालगाडीतील १९८१ मध्ये डाळ चोरी करणाºया आरोपीस पोलिसांनी तब्बल ३५ वर्षानंतर अटक केली आहे. सदर आरोपी
>- सचिन राऊत/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.04 - अकोला रेल्वे स्थानकावरून जात असलेल्या एका मालगाडीतील १९८१ मध्ये डाळ चोरी करणाºया आरोपीस पोलिसांनी तब्बल ३५ वर्षानंतर अटक केली आहे. सदर आरोपी शंकरनगर आकोट फैल येथील रहिवासी असून त्याने तरुण वयात ही चोरी केल्यानंतर फरार झाला होता, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तब्बल ३५ वर्षानंतर म्हणजेच आरोपी वृद्ध झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
शंकरनगर येथील रहिवासी माणिक दादू नृपनारायण हा बरेच वर्षानंतर त्याच्या घरी आला आहे. त्याने १५ नोव्हेंबर १९८१ मध्ये एका मालगाडीतून ६० रुपयांची १५ किलो डाळ चोरी केली होती. त्यानंतर तो अकोल्यात आला; मात्र पोलिसांना याची माहितीच मिळाली नाही. १९८१ च्या चोरीनंतर मंगळवारी आरोपी अकोल्यात असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांना मिळाली. त्यांनी शंकरनगर येथे पाळत ठेवून आरोपी माणिक नृपनारायण याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने १५ किलो डाळ चोरीची कबुली दिली असून पोलीस त्याला बुधवारी भुसावळ येथील रेल्वे न्यायालयामध्ये हजर करणार आहे.
साथीदाराने भोगली शिक्षा
मालगाडीतील डाळ चोरी प्रकरणातील आरोपी माणिक नृपनारायण याचा साथीदार अशोक कांबळे याला पोलिसांकडून १३ जानेवारी १९८२ रोजी अटक करण्यात आली होती. त्याने चोरीची कबुली दिल्याने भुसावळ येथील रेल्वे न्यायालयाने त्याला एक महिन्याची शिक्षा सुनावली होती. अटकेनंतर २८ दिवसांची शिक्षा भोगली असतानाही त्याने आणखी एक महिन्याचा कारावास भोगला.
अशी केली होती चोरी
राजस्थानमधील चिडावा येथून तामिळनाडूतील मदुराईसाठी एक मालगाडी पाठविण्यात आली होती. यामध्ये हरभरा डाळीचे पोते होते. १५ नोव्हेंबर १९८१ रोजी सदर मालगाडी अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर कांबळे आणि नृपनारायण या दोघांनी मालगाडीच्या एका वॅगनचे सील तोडून यामधील ६० रुपये किमतीची १५ किलो हरभरा डाळ चोरली होती. या प्र्रकरणी आरपीएफ पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.