आंबेडकरांचा ३५० फुटी पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 06:44 AM2016-08-23T06:44:09+5:302016-08-23T06:44:09+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा अतिभव्य पुतळा उभारण्यात येणार
मुंबई : इंदू मिलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या भव्य स्मारकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा अतिभव्य पुतळा उभारण्यात येणार असून, हा पुतळा अमेरिकेतील ‘लिबर्टी आॅफ स्टॅच्यू’हून उतुंग असणार आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या नव्या आराखड्यास आज सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या एकसदस्यीय समितीने मंजुरी दिली.
दादर येथील इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचे शासनाने घोषित केल्यानंतर विख्यात वास्तुरचना विशारद शशी प्रभू यांनी सादर केलेल्या आराखडयावर आंबेडकरी चळवळतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पाशर््वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आंबेडकरी नेत्यांच्या सूचना ऐकून त्यांचे समाधान होईल, असा आराखडा तयार करण्यासाठी बडोले यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन केली होती.
या समितीने सर्व नेत्यांसोबत अनेक बैठका घेऊन त्यांनी केलेल्या सूचना स्विकारून त्याप्रमाणे नवीन आराखडा तयार केला. हा नवीन आरखडा देखील शशी प्रभू यांनीच तयार केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आराखडा समितीच्या निर्णयाला तत्वत: मंजूरी दिल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
>असे असेल स्मारक
या स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय तसेच भव्य आर्ट गॅलरी उभारण्यात येईल, त्यात
डॉ. बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू तसेच त्यांच्या जीवनासंबंधी कलाकृतींचा समावेश असेल.
स्मारकाच्या इमारतीचा आकार संसदेसारखा ठेवला असून, महाडच्या चवदारतळ्याच्या प्रतिकृतीसह भव्य प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे.
>जगातील उंच पुतळे
597 उंच सरदार वल्लभाई पटेल ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’, गुजरात
305.1 उंच ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’, अमेरिका
502 उंच स्प्रिंग टेम्पलचा बुद्धाचा पुतळा, चीन
381 उंच भगवान बुद्धाचा पुतळा, म्यानमार