ल्युब्रिकंट्स विक्रीच्या नावाखाली ३.५० लाखांचा गंडा
By admin | Published: April 26, 2017 02:05 AM2017-04-26T02:05:59+5:302017-04-26T02:05:59+5:30
रुंगटा पेट्रोल पंप संचालकासह पाच पेट्रोल पंप चालकांना चुना
अकोला : जिल्ह्यातील पेट्रोल पंप संचालकांकडे देण्यात येत असलेले ल्युब्रिकंट्स (आॅइल) आणि ग्रीस विक्री करून देण्याच्या नावाखाली अकोल्यातील पाच पेट्रोल पंप संचालकांना त्यांनीच नेमलेल्या एका दलालाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी रुंगटा पेट्रोल पंपाच्या संचालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रपुरातील चेतन शहा नामक व्यक्तीविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पेट्रोल आणि डीझल डेपो संचालकांकडून पेट्रोल पंप संचालकांना पेट्रोल आणि डीझल देण्यात येते. पेट्रोल आणि डीझल देताना पेट्रोल पंपचालकांना ल्युब्रिकंट्स आणि ग्रीस ग्राहकांना विकावे म्हणून जबरदस्तीने देण्यात येते. सदर ग्रीस आणि ल्युब्रिकंट्स पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांकडून विक्री होत नसल्याने त्यांनी हे ग्रीस आणि ल्युब्रिकंट्स विक्रीसाठी चंद्रपूर येथील रहिवासी चेतन शहा नामक व्यक्तीला दलाल म्हणून नेमले. त्यामुळे अकोटातील दोन आणि अकोला शहरातील तीन पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांनी चेतन शहाला ल्युब्रिकंट्स आणि ग्रीस विक्रीसाठी कंत्राट दिला. त्यानुसार डिसेंबर २०१६ आणि जानेवारी २०१७ फ ेब्रुवारी या तीन महिन्यांमध्ये चेतन शहाने ल्युब्रिकंट्स आणि ग्रीस विक्री करून त्याचे पैसे पेट्रोल पंप संचालकांना परत केले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील काही साठा आणि मार्च महिन्यातील साठा असा दोन महिन्यांचा ल्युब्रिकंट्स आणि ग्रीसचा साठा घेऊन तो पसार झाला. पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांनी शहाशी संपर्क साधला असता त्याने सुरुवातीला टाळाटाळ केली आणि नंतर भ्रमनध्वनी बंद करून पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणाची तक्रार रुंगटा पेट्रोल पंपाचे संचालक मोहन रुंगटा यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर पोलिसांनी चेतन शहा याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
चेतन शहाची नावे अनेक
चेतन शहा नामक व्यक्तीच नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने विविध आधार कार्डद्वारे बनावट आधार कार्ड बनवून त्यावरील नावे बदलून पेट्रोल पंप संचालकांना गंडा घातल्याची माहिती आहे. यामध्ये शहाचे चंद्रपूर शहरातील नाव नानीभाई पटेल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चेतन शहा नामक व्यक्तीच अस्तित्वात नसल्याची माहिती आहे.
चेतन शहाचे राज्यभर जाळे
चेतन शहा हा स्वत:च पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांना भेटला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याने या संचालकांची भेट घेऊन ल्युब्रिकंट्स आणि ग्रीस विक्री करून देण्याचे आमिष संचालकांना दिले. या आमिषाला बळी पडत जिल्ह्यातील पेट्रोल पंप संचालकांनी त्याच्यासोबत कंत्राट केला. पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी शहाने दोन महिन्यांची रक्कम अदा केली; मात्र त्यानंतर दोन महिन्यांचा साठा घेऊन तो पसार झाला आहे.
ल्युब्रिकंट्स आणि आॅइल विक्री करून देण्याच्या नावाखाली अकोला जिल्ह्यातील पेट्रोल आणि डीझल पंप संचालकांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर अकोल्यातील पाच पेट्रोल आणि डीझल पंप असल्याची माहिती असून, तपासानंतर आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सध्यातरी हा तपास जिल्हा स्तरावर असून, हे फसवणुकीचे जाळे अनेक शहरांत असल्याचे दिसून येते.
- किशोर शेळके, ठाणेदार, एमआयडीसी पोलीस स्टेशन, अकोला.