माणदेशात सापडले ३५०० वर्षांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष!
By admin | Published: October 26, 2015 12:08 AM2015-10-26T00:08:21+5:302015-10-26T00:10:40+5:30
उत्खननासाठी प्रयत्न : पृष्ठीय सर्वेक्षणात आढळल्या शंखांपासून बांगड्या बनविणाऱ्या कारागिरांच्या पाऊलखुणा--लोकमत विशेष
राजीव मुळ्ये-- सातारा शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागिरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत. पृष्ठीय सर्वेक्षणात सापडलेले असंख्य अवशेष थेट सातवाहन काळात नेणारे असून, कारागिरांनी वापरलेली अवजारे उत्तर ताम्रपाषाण युगातील असल्याचा अंदाज आहे.
माण तालुक्यातील एका गावाजवळ माणगंगा नदीकिनारी प्रचंड संख्येने आढळलेले शंखांच्या बांगड्यांचे कातकाम केलेले तुकडे, बांगडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहाणी, कोरीव कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्माश्म अवजारांचे तुकडे पाहता, निर्यातीसाठी बांगड्या बनविण्याचा कारखानाच येथे अस्तित्वात होता, या निष्कर्षाला अभ्यासक पोहोचले आहेत.
सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी हा ‘खजिना’ शोधून काढला असून, तिथे मोठ्या प्रमाणात अजूनही दिसत असलेल्या इतर अवशेषांना धक्का लागू नये म्हणून त्यांनी हे ठिकाण गोपनीय ठेवले आहे. येथे उत्खनन
केल्यास अत्यंत प्राचीन संस्कृतीचा ठेवा गवसण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर उत्खननाशी संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यात आला आहे. येथे सापडलेले शंख ‘टर्बुनिल्ला पायरम’ जातीचे असून, ते केवळ तमिळनाडू किंवा सौराष्ट्रातील खंबातच्या आखातात सापडतात. माणमध्ये सापडलेले शंख खंबातच्या आखातातील असावेत, असे दिसते. लाटेबरोबर वाहत आलेल्या मोठ्या शंखाच्या पोटात लहान शंख आढळतात, तेही येथे आढळले असून, बांगड्या बनविताना शंखाचा काढून टाकलेला गाभाही आढळला आहे. मेसोपोटेमिया भागातून शंखांच्या बांगड्यांना त्याकाळी मोठी मागणी होती. त्या भारतातून तिकडे जात असत, याचे पुरावे पूर्वीच आढळले आहेत. सिंधू संस्कृतीतही शंखांच्या बांगड्यांचे पुरावे आढळले असून, दंडापर्यंत बांगड्या घातलेल्या नर्तकीचे शिल्प हडप्पामध्ये सापडले होते. या शृंखलेची कडी माणदेशाशी जोडली गेल्याचा पुरावा आता सापडल्याने प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने माण तालुक्यास मोठे महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.
झिलईच्या भांड्यांचे तुकडेही आढळले
धातूंच्या आधी धातूंची संयुगे माणसाला ज्ञात होती आणि मातीच्या भांड्यांना त्याची झिलई करण्यात येत होती, असे इतिहास सांगतो. ताम्रयुगाच्या अखेरचा हा काळ होय. माण तालुक्यात झिलई केलेल्या भांड्यांचे अवशेषही सापडले आहेत. उत्खनन केल्यास भट्टीही सापडू शकेल, असे जिज्ञासूंचे मत आहे.
सातारा जिल्ह्याचा इतिहास प्रागैतिहासिक काळापर्यंत पोहोचणारा असल्याने अभ्यास आणि पर्यटन या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पांढरीच्या टेकाडांचे संरक्षण करून ठिकठिकाणी उत्खनन झाल्यास निसर्ग पर्यटनाबरोबरच जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.
- विक्रांत मंडपे, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था