पांढुर्ण्याच्या गोटमारीत ३५४ जखमी; कोरोना काळात आदेश झुगारत लोकांनी उत्सव केला साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 07:27 PM2020-08-20T19:27:18+5:302020-08-20T19:28:24+5:30
प्रशासनाने सावरगाव व पांढुर्णा येथील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन केवळ पाच जण पूजा करतील. यंदा गोटमार होणार नाही, असा निर्णय जाहीर केला. मात्र, तो डावलून गोटमारीची परंपरा अबाधित राखण्यात आली.
सुभाष दाभीरकर
टेंभुरखेडा (अमरावती) : मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवरील पांढुर्णा परिसरात गुरुवारी कोरोना काळातील मनाई हुकूम झुगारून 'गोटमार' पार पडली. या परंपरागत उत्सवात ३५४ जण जखमी झाले असून, दोघे गंभीर आहेत.
पांढुर्ण्याच्या प्रसिद्ध गोटमारीला गुरुवारी सकाळी ११ वाजता दरम्यान सुरुवात झाली. सकाळी ७ वाजताचे सुमारास सावरगाव येथील कावळे कुटुंबीयांनी जाम नदीच्या पुलावर मध्यभागी झेंडा बांधला. १0 वाजेपर्यंत नागरिकांनी झेंड्याची पूजा केली. त्यानंतर सुरू झालेल्या गोटमारीत ३५४ नागरिक जखमी झाले. दोघांना गंभीर इजा पोहोचली.
आदेश झुगारला
प्रशासनाने सावरगाव व पांढुर्णा येथील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन केवळ पाच जण पूजा करतील. यंदा गोटमार होणार नाही, असा निर्णय जाहीर केला. मात्र, तो डावलून गोटमारीची परंपरा अबाधित राखण्यात आली. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील गोटमार समितीसह शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या सहमतीने सकाळी १० वाजता तो झेंडा पांढुर्णावासीयांच्या स्वाधीन करून मां चंडिकेच्या मंदिरात नेऊन ठेवण्यात येणार होता. पांढुर्णा पक्षाचे नागरिक झेंडा नेण्याकरिता अपयशी ठरल्याने सकाळी ११ वाजताचे सुमारास गोटमारीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ६.३0 वाजता दरम्यान गोटमार थांबविण्यात आली. आपसी सहमतीने तो झेंडा पांढुर्णावासीयांनी मां चंडिका देवीच्या मंदिरात नेऊन ठेवला. त्यानंतर या गोटमारीचा समारोप करण्यात आला.
यावेळी सावरगाव आणि पांढुर्णा येथे नागरिकांमध्ये तुफान गोटमार सुरू झाल्याचे चित्र दिवसभर होते. पांढुर्णा येथे संचारबंदी व नाकाबंदी जाहीर केल्याने अनेकांना पांढुर्णा शहरात दाखल होता आले नाही. पांढुर्णा शहरात प्रशासनाकडून जनता कर्फ्यू घोषित करण्यात आले होता. दरम्यान संपूर्ण बाजारपेठसुद्धा बंद होती. मात्र, नागरिकांनी घराघरांतून बाहेर निघून गोटमारस्थळी हजेरी लावली. दोन्ही पक्षांचे नागरिक एक दुसºयावर तुफान दगडफेक करीत असताना कधी सावरगाव येथील तर, कधी पांढुर्ण्याचे लोक भारी पडत असल्याचे चित्र होते. या दगडफेकीत कर्तव्यावर असलेले पोलीससुद्धा थोडक्यात बचावले. त्यानंतर तेथून पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला. छिंदवाड्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक शशांक आनंद यांनी त्वरित पांढुर्णा गाठले.