वसई-विरार परिसरातून ३६ बोगस डॉक्टर गायब

By admin | Published: July 21, 2016 03:11 AM2016-07-21T03:11:19+5:302016-07-21T03:11:19+5:30

दहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने यातील ३६ डॉटरांनी पळ काढला आहे

36 bogus doctors missing from Vasai-Virar area | वसई-विरार परिसरातून ३६ बोगस डॉक्टर गायब

वसई-विरार परिसरातून ३६ बोगस डॉक्टर गायब

Next

शशी करपे,

वसई- वसई विरार परिसरातील ५१ बोगस डॉक्टरांची यादी तयार होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने यातील ३६ डॉटरांनी पळ काढला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या संशयास्पद कारभारामुळे हे डॉक्टर पळून गेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
वसई विरार परिसरात बोगस डॉटरांचा सुळसुळाट झाला असून नॅचरोपॅथी, आरएमपी, एनडी, डीईएचएम, डीयूएमएस. डीआयएएसएम, एवीवीएआर, सीएचएमआर, बीएएचएमएस, आयुर्वेदीक, फिजीओथोरेपिस्ट अशा विविध पदव्या धारण केलेले डॉक्टर म्हणून अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. नालासोपारा येथील शिर्डीनगरात डॉ. दुबे आणि डॉ.आर. विश्वकर्मा यांनी न्यू लाईफ हेल्थ केअर सेंटर सुरु केले होते.
या दोघांची पदवी तर चक्रावून टाकणारी आहे. या बोगस डॉक्टरांनी बोर्डावर बी. कॉम, डीईएचएम, एनडी ही अफलातून पदवी लिहून वैद्यकीय धंदा सुरु केला होता. अशाच पद्धतीने किमान दोनशेहून अधिक बोगस डॉक्टर या परिसरात खुलेआम धंदा करीत आहेत.
याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे करून नोव्हेंबर २०१५ ला ५१ बोगस डॉक्टरांची यादी जाहिर केली होती. धक्कादायक बाब म्हणजे यातील फक्त तीनच डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांच्याकडे विचारणा केली असता ही संशयित डॉक्टरांची यादी असून त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले होते. मात्र, दहा महिने उलटून गेले तरी यातील तीन वगळता एकाही डॉक्टरवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. दुसरीकडे यादीत नसलेल्या आठ बोगस डॉक्टरांवर थेट कारवाई करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.
।त्यांना पळून जाण्यास संधी दिल्याची तक्रार
वसई विरार शहरामध्ये सध्या २१० नोंदणीकृत हॉस्पीटल आणि ७१० नोंदणीकृत दवाखाने आहेत. चार बोगस हॉस्पीटलवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहेत. मात्र, वेळेत कारवाई न करण्यात आल्याने यादीतील ३६ बोगस डॉक्टर गायब झाल्याची माहिती उजेडात आली आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे बंधनकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने त्यांना पळून जाण्यास संधी दिल्याची तक्रार आमदार ठाकूर यांनी केली आहे. गुन्हेगार असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्याने कारवाई न केल्याने बेपत्ता झाले आहेत.
बोगस डॉक्टरांना पळून जाण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपमा राणे यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना संरक्षण देणे व कामात कुचराई करणे या दोषारोपाखाली डॉ. राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.

Web Title: 36 bogus doctors missing from Vasai-Virar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.