ठाण्यातील ३६ तलाव कात टाकणार
By admin | Published: April 4, 2017 04:12 AM2017-04-04T04:12:32+5:302017-04-04T04:12:32+5:30
महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली
ठाणे : लोकमतने काहीतरी कर ठाणेकर, या चळवळीअंतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याची दखल घेऊन महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तलाव सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यावर भर देऊन कोट्यवधींची तरतूद केली आहे. यानुसार, शहरातील ३६ तलावांचा एकात्मिक सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास राज्य शासनानेदेखील मंजुरी दिली आहे.
यामुळेच तलाव पुनरुज्जीवन व शुद्धीकरण या लेखाशीर्षांतर्गत ३० कोटी आणि तलाव सुशोभीकरणांतर्गत ९.५० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे ठाण्यातील तलाव लवकरच कात टाकणार आहेत.
ठाण्यातील तलावांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात ‘लोकमत’ने ‘काहीतरी कर ठाणेकर’, या चळवळीअंतर्गत याला वाचा फोडली होती. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तलवांचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने त्यानुसार पावले उचलली आहेत. महापालिका हद्दीत ३६ तलाव असून त्यांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्यासाठी सर्व
तलाव व तलाव परिसर प्रदूषणमुक्त
व नागरी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी पालिकेने ही योजना आखली आहे.
यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तलावातील गाळ काढणे, भिंत उभारणे, जॉगिंग ट्रॅक, एलईडी दिवे, गार्डन, खेळणी, शौचालय, फाउंटन, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, निर्माल्यकलश, गेट उभारण्याच्या कामांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वास्तुविशारद महाविद्यालयास सल्लागार म्हणून नेमण्याची योजना आखली आहे. त्यातून हे तलाव कात टाकतील. (प्रतिनिधी)