नोकरीच्या आमिषाने ३६ लाखांचा गंडा

By admin | Published: August 27, 2016 02:23 AM2016-08-27T02:23:06+5:302016-08-27T02:23:06+5:30

एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून साडेतीन लाखात मुंबई छत्रपती विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो

36 lakhs for job bribe | नोकरीच्या आमिषाने ३६ लाखांचा गंडा

नोकरीच्या आमिषाने ३६ लाखांचा गंडा

Next


पनवेल : एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून साडेतीन लाखात मुंबई छत्रपती विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून एक महिला व तिच्या साथीदारांनी २२ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अश्विनी जगताप या महिलेने अनेक विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने दिली. बनावट ओळखपत्रे देऊन त्यांची शारीरिक चाचणीही घेतली.
खारघर सेक्टर २१ मध्ये राहणाऱ्या गायत्री नाडकर्णी या पाळणाघर चालवितात. पाळणाघराबाबत चौकशी करण्यासाठी अश्विनी आणि त्यांचे सहकारी शरबजीत सिंग कौर आणि मंजीत सिंग पेलिया गेले होते. या वेळी नाडकर्णी यांनी पतीला नोकरीची गरज असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी तिघांनी आम्ही फ्लायबर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत असून तीन लाख रुपये भरल्यास कायमस्वरूपी देऊ, अशी हमी दिली. याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जनसंपर्क अधिकारी पदासाठी आॅफरही दिली. त्यांच्या आमिषाला बळी पडून सुरेश नाडकर्णी यांनी अडीच लाख रुपये दिले. या पदासाठी इंग्लिश व फ्रेंच आवश्यक असल्याने नाडकर्णी यांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देखील घेतले.
दरम्यान, या तिघांनी आमच्या कंपनीत विविध पदे भरायची असल्याचे सांगितले. नाडकर्णी यांनी आपले मूळ गाव असलेल्या कवठेमहाकाळ गावातील २१ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी एक ते दोन लाख घेऊन जवळपास ३६ लाख ४९ हजार रु पये धनादेश व रोख रकमेच्या स्वरूपात तिघांकडे टप्प्याटप्प्याने दिले.
नोकरीसाठी आवश्यक असलेला तीन महिन्यांचा इंग्लिश स्पिकिंग कोर्सही या विद्यार्थ्यांनी सीवूड येथे पूर्ण केला. इतकेच नव्हे सायन आणि वाशी येथील खाजगी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करून घेतली. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरच्या बाजूला प्रशिक्षण देऊन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे ओळखपत्र आणि बीसीए पास देऊन पंधरा दिवसात राहत्या घरी कायमस्वरुपी नियुक्तीचे पत्र मिळेल, असे सांगून विद्यार्थ्यांना आपापल्या गावी पाठवले.
मात्र पंधरा दिवस उलटले तरी नियुक्ती पत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी तिघांकडे विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्यातील काहींनी विमानतळ प्राधिकरणाकडे चौकशी केली असता, ओळखपत्र आणि पास बनावट असल्याचे समजले. याप्रकरणी नाडकर्णी यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>आरोपी महिलेचा शोध सुरू असून तिने दिलेला पत्ता चुकीचा आहे. तिचा फोनही बंद आहे. लवकरच तिच्यासह अन्य दोघांनाही अटक करू.
- अरविंद वळवी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक

Web Title: 36 lakhs for job bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.