३६ लोकल स्थानकांचा मेकओव्हर
By admin | Published: September 3, 2016 01:52 AM2016-09-03T01:52:59+5:302016-09-03T01:52:59+5:30
मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचे २ आॅक्टोबरपूर्वीचे त्यांचे रुप अणि नंतरचे रुप यात जमीनअस्मानचे अंतर असेल. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान त्यांचा अनोखा असा मेकओव्हर केला
मुंबई : मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचे २ आॅक्टोबरपूर्वीचे त्यांचे रुप अणि नंतरचे रुप यात जमीनअस्मानचे अंतर असेल. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान त्यांचा अनोखा असा मेकओव्हर केला जाणार आहे. एरवी रुक्ष वाटणारी ही स्थानके रंगीबेरंगी आणि आकर्षक बनतील. ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ असे या उपक्रमाचे नाव असेल.
मुंबई फर्स्ट आणि मेकिंग अ डिफरन्स फाऊंडेशन या संस्थांनी सदर अभिनव उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात स्वयंसेवक, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, रिअल इस्टेट कंपन्या आणि उद्योगांचे सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक रेल्वे स्थानक रंगीबेरंगी करण्यात येईल हे करताना त्या-त्या स्थानकाच्या परिसरात असलेली महत्त्वाच्या स्थळांची चित्रे रंगविली जाणार आहेत. वेस्टर्न रेल्वेची चर्चगेट ते दहिसरपर्यंतची चर्चगेटसह २१ स्थानके आणि सेंट्रल लाइनवरील ठाण्यापर्यंतच्या १५ स्थानकांचा समावेश असेल. सीएसटी आणि भायखळा, विद्याविहार, दादर या स्थानकाचा मात्र समावेश नसेल.
‘मुंबई फर्स्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी लोकमतला सांगितले की, ही कल्पना साकारण्यासाठी निधीबाबतदेखील लोकसहभाग घेतला जात असून मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ५०० जणांनी नोंदणी केली आहे. स्थानके स्वच्छ करण्यापासून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यापर्यंतच्या प्रत्येक कामात ते सहभागी होतील. एका स्थानकासाठी साडेतीन लाख ते
पाच लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.
या सौंदर्यीकरणाचे डिझाईन हे विविध कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आले आणि त्यातून निवड करण्यात आली. केवळ या स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यावरच न थांबता त्यांची देखभाल करणारी यंत्रणाही उभारली जात आहे. (विशेष प्रतिनिधी)