जळगाव-भुसावळ तिस-या रेल्वेमार्गावर ३६ लहान पूल
By admin | Published: July 6, 2016 03:24 PM2016-07-06T15:24:57+5:302016-07-06T15:24:57+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ या दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे (थर्ड) रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ६ - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ या दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे (थर्ड) रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर तब्बल ३६ लहान व चार मोठे पूल उभारण्यात आले आहेत.त्यांचे बांधकाम सुरू आहे,अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
दोन टप्प्यात काम
भुसावळ-जळगाव हा तिसरा रेल्वे मार्ग एकूण २४.१३ कि.मी.लांबीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुसावळ-भादली आणि जळगाव-भादली अशा दोन टप्प्यात या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
दरम्यान भुसावळ-भादली मार्ग मार्च २०१८ व जळगाव-भादली मार्ग मार्च २०१९ पर्यंत बांधून पूर्ण होईल.या मार्गावर तब्बल ३६ लहान पूल व चार मोठे पूल आहेत.यात वाघूर नदीवरील पूल,भुसावळातील रेल्वे दगडी पूल,तरसोद व जळगाव येथील पुलांचा समावेश आहे. येत्या आॅक्टोबर पर्यंत या पुलांचे बांधकाम पूर्ण होईल.ही कामे पूर्ण झाल्यानंतर भुसावळ येथील यार्डातील कामांना प्रारंभ होईल.
भू-संपादन प्रक्रिया
या मार्गासाठी अत्यंत आवश्यक अशी चार कि.मी.इतकी जमीन भू-संपादनाची प्रक्रिया व्हायची आहे. ही जमीन तरसोद, नशिराबाद आणि आसोदा या तीन गावांच्या शिवारातील आहे. जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन संपादनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. जमीन संपादनानंतर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळेल,असे सूत्रांनी सांगितले.
१०० कोटी उपलब्ध
दरम्यान, जमीनीवरील कामासाठीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी रेल्वेकडून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे,असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.