३६ सोशल मीडिया पोस्टमुळं महाराष्ट्रात हिंसा भडकली; पोलिसांनी सोपवला रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 08:40 PM2021-11-17T20:40:04+5:302021-11-17T20:40:55+5:30
पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली.
मुंबई – महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेड इथं अलीकडेच दंगल घडली. राज्यातील या परिस्थितीवर पोलिसांनी गृहविभागाला अहवाल सोपवला आहे. यात सोशल मीडियातील पोस्ट आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे राज्यात दंगल भडकली असं म्हणण्यात आलं आहे. सोशल मीडियात अशा अनेक गोष्टी पोस्ट केल्या गेल्या ज्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या. पोलीस लवकरच पोस्ट करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.
या रिपोर्टमध्ये ३६ सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख आहे. ज्यात ट्विटरवर २५ तर फेसबुकवर ६ आणि इन्स्टाग्रामवर ५ पोस्ट आहेत. त्रिपुरातील एका अफवेमुळे महाराष्ट्रात हिंसक आंदोलन होणं हे दुखदं घटना होती. पोलिसांच्या या रिपोर्टला सोशल मीडिया मॉनिटरिंग रिपोर्ट शीर्षक देत गृह विभागाला सोपवलं आहे. पोलिसांच्या मते, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील विविध भागात हिंसक आंदोलनं पेटली. महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत मागील शुक्रवारी हिंसाचार घडला होता. त्यानंतर राज्यात कर्फ्यू लावण्यात आला. संवेदनशील भागात पोलीस जवानांची संख्या वाढवण्यात आली.
चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका - पोलीस
या घटनेनंतर अमरावतीत आपत्कालीन सेवा इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील कुठल्याही पोस्टवर आणि चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्रिपुराच्या घटनेचा उल्लेख करत महाराष्ट्रात हिंसाचार वाढला. पोलिसांनी आतापर्यंत यातील ५० आरोपींना अटक केली आहे.
त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य
त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.
राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह - भाजपा
धार्मिक दंगली संदर्भात राज्य सरकारच्या भूमिकेवर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १२ नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा अशी मागणी भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी केली आहे.