मुंबईतील ३६ स्थानकांचा होणार कायापालट
By admin | Published: October 3, 2016 05:41 AM2016-10-03T05:41:34+5:302016-10-03T05:41:34+5:30
रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ हा उपक्रम राबविण्यात येणार
मुंबई : मुंबई महानगरातील ३६ रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एम.ए.डी.फाउंडेशनच्या या उपक्रमाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी खासदार पूनम महाजन, अभिनेता अनिल कपूर, रेल्वेचे अधिकारी आणि स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, हमारा स्टेशन हमारी शान हा एक चांगला उपक्रम आहे. मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या रेल्वे स्थानकांचा कायापालट या माध्यमातून होणार आहे. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे सुंदर ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला ट्रेनमध्ये प्रवास करताना आनंद वाटला पाहिजे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, मुंबई स्वच्छ करण्याबरोबर सुंदर करायची आहे. यासाठी सवयी बदलाव्या लागतील.
स्वयंसेवी संस्था व आणि लोकसहभागातून हा बदल शक्य आहे. त्यासाठी एकला चलो रे, या उक्तीप्रमाणे सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यानंतर लोक स्वत:च मागोमाग येतील. (प्रतिनिधी)
>प्रशंसनीय उपक्रम
खासदार पूनम महाजन या वेळी म्हणाल्या की, एम. ए. डी. फाउंडेशनने हमारा स्टेशन हमारी शान हा उपक्रम हातात घेऊन प्रशंसनीय काम केले आहे. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वेला आणि मुंबईकरांना भरपूर काही दिले आहे. पुढील तीन वर्षांत मुंबईतील रेल्वे स्टेशन्सवर सर्व सुविधा पुरविण्यात येतील.