३६ विद्यार्थिनींना विषबाधा
By admin | Published: March 16, 2016 08:37 AM2016-03-16T08:37:00+5:302016-03-16T08:37:00+5:30
कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कळंबोली : कामोठे येथील एमजीएम नर्सिंग महाविद्यालयातील ३६ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारार्थ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री घडलेला हा प्रकार व्यवस्थापनाने दाबून ठेवला होता. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत पोलिसांना कळवल्यावर विषबाधेचा प्रकार उघड आला. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोजा यांनी सांगितले.
पनवेल - सायन महामार्गालगत महात्मा गांधी मिशनचे रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल आहे. या ठिकाणी अभियांत्रिकी, वैद्यकीय त्याचबरोबर नर्सिंग महाविद्यालय आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी रविवारी महाविद्यालयाच्या मेसमध्ये रात्री जेवण केले. मात्र त्यापैकी ३६ जणींना पहाटे उलट्या, मळमळणे, जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यापैकी दोघींची प्रकृती गंभीर आहे, तर २४ विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित मुलींना डिसचार्ज देण्यात आला आहे. रात्रीच्या जेवणात विद्यार्थिनींनी भात, भाजी, जिलेबी खाल्याची माहिती पुढे येत आहे.
विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधेबाबत व्यवस्थापनाने कमालीची गुप्तता पाळली. सोमवारी रात्रीपर्यंत याबाबत माहिती बाहेर आली नाही. हे प्रकरण दडपण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न काही पालकांनी उधळून लावला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. केरळच्या काही स्थानिक संघटनांनी याबाबत तक्रार केल्यावर मंगळवारी सकाळी कामोठे आणि खान्देश्वर पोलिसांच्या पथकाने एमजीएम रुग्णालयात धाव घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
पायाभूत सुविधांचा अभाव, भरमसाठ शुल्कवाढ त्याचबरोबर वर्ग खोल्यांमध्ये अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे गेल्या २-३ वर्षांपासून कामोठेतील एमजीएम महाविद्यालय चर्चेत आहे. आता नर्सिंगच्या विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधेमुळे व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.
निकृष्ट जेवण
खानावळचालकाने निकृष्ट दर्जाचे अन्न विद्यार्थिनींना दिल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
त्याचबरोबर पालक आणि शैक्षणिक संकुलातील इतर विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रि या नोंदवल्या आहेत. याबाबत महाविद्यालयातून प्रतिक्रि या मिळू शकली नाही.
मंगळवारी सकाळी नर्सिंग महाविद्यालयातील विषबाधेचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार आम्ही चौकशी करीत आहोत. या प्रकरणी नेमके दोषी कोण याबाबत आताच सांगणे कठीण आहे. मात्र जे कोणी या घटनेत दोषी आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- ममता डिसोजा, पोलीस निरीक्षक, कामोठे