जिल्ह्यातील ३६७ तलाठी बेमुदत संपावर
By Admin | Published: April 27, 2016 03:29 AM2016-04-27T03:29:52+5:302016-04-27T03:29:52+5:30
रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी जनसामान्यांच्या विविध कामांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा खोळंबा झाल्याचे सर्वत्र पहायला मिळाले.
गेल्या ८ जानेवारी २0१६ पासून, महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याने सर्वसामान्य जनतेशी संबंधित अशा सातबारा उतारे, फेरफार नोंदी, आदि महत्वाच्या दस्तऐवजांकरिता आॅनलाइन प्रणाली सक्तीची करुन, पूर्वीचे हाती नोंदी घालण्याची पद्धत रद्दबातल केली. यामुळे सध्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, सर्वत्र तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसुली कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची महत्वाची कामे अडून राहिली असल्याने, पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी हाती नोंदी घालणे, सातबारा देणे सुरु ठेवावे तसेच सरकारी संगणकांच्या सर्व्हरची क्षमता वाढवून जनसामान्यांची ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांना देवून त्याच्या प्रती राज्याचे महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत.
गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी या आॅनलाइन प्रणालीचे कामकाज सुरु झाले व एलएमएस प्रणालीद्वारे महसुली नोंदींचा डेटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यातच तलाठी आॅफिसला प्रिंटर नसणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसणे, कित्येकदा लाइट नसणे, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास तांत्रिक सहाय्यक नसणे अशा अनेक अडचणी तेव्हापासून आजही असल्याचे जोग यांनी सांगितले.