ऊस खरेदी कर माफीमुळे ३७२ कोटींचा फायदा
By admin | Published: March 19, 2017 12:49 AM2017-03-19T00:49:18+5:302017-03-19T00:49:18+5:30
राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन वर्षांचा ऊस खरेदी कर माफ करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कारखान्यांना ३७२ कोटींचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे अपुऱ्या ऊस उत्पादनाने अडचणीतील साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. मागील दोन वर्षांतील उसाच्या उत्पादनाची तुलना केली तर केवळ ३७२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर, सांगलीचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम दोन महिनेच चालला. परिणामी, कारखान्यांच्या उत्पादन खर्चात प्रतिटन २५० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका बसला.
अशा परिस्थितीतून कारखान्यांना सावरण्यासाठी ऊस खरेदी कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हंगाम २०१५-१६ व २०१६-१७ असा दोन वर्षांचा खरेदी कर माफ केला आहे. साधारणत: प्रतिटन १०० रुपये खरेदी कर माफ झाला तर कारखान्यांना ३७२ कोटींची मदत होणार आहे. (प्रतिनिधी)