मुंंबई @ ३८ अंश; उष्णतेच्या लाटेचा तडाखा
By admin | Published: February 26, 2017 04:16 AM2017-02-26T04:16:48+5:302017-02-26T04:16:48+5:30
कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान
मुंबई : कमाल तापमानाचा पारा दिवेंसदिवस वाढतच असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान थेट तीन अंशांनी वाढून ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आठवड्याभरातील हे उच्च तापमान असून, रविवारी, सोमवारी मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. परिणामी मुंबईकरांचा घाम निघणार आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
रत्नागिरीचे तापमान ३९.३ नोंदवण्यात आले आहे. सर्वसाधारण तापमानापेक्षा रत्नागिरीच्या तापमानात ८.५ अंशाची वाढ नोंदवण्यात आली आहे. हे आतापर्यंतचे येथील उच्च तापमान असून, २५ फेब्रुवारी १९४५ रोजी रत्नागिरीचे तापमान ३८.३ अंश नोंदवण्यात आले होते. दुसरीकडे भिरा येथेही कमाल तापमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान खात्याकडील नोंदीनुसार भिरा येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वेंगुर्ला येथेही कमाल तापमान ३७.२ अंश नोंदवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत मागच्या वर्षी फेब्रुवारीत ३३.२ अंश कमाल तापमान होते. तसेच शुक्रवार २५ फेब्रुवारी २०१७ रोजी कमाल तापमान ३५ अंश होते.
एका दिवसांत ते तीन अंशांनी वाढल्याने उष्णतेच्या लाटेत मुंबईकर होरपळू लागले आहेत.