राज्यातील ३८ स्थानके पुनर्विकासाच्या ‘ट्रॅक’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 04:56 AM2016-11-04T04:56:44+5:302016-11-04T04:56:44+5:30
देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला.
सुशांत मोरे,
मुंबई- देशभरातील ए-१ आणि ए श्रेणीतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला. यातील ३८ स्थानके ही महाराष्ट्रातील आहेत. या कामाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विकासकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. विकास करताना स्थानक व परिसरात फूड कोर्ट, हॉस्पिटल, पार्किंग, वैद्यकीय सुविधांसह अनेक सुविधा देण्यात येतील.
प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे अपुऱ्या पडत जाणाऱ्या सुविधा तसेच नव्या सोयिसुविधांची मागणी पाहता या श्रेणीतील स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ए-१ आणि ए श्रेणीतील ३३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. आंध्र प्रदेश, ओडिसा, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम या राज्यातील स्थानकेही आहेत. राज्यातील ३८ स्थानकांमध्ये ए-१ श्रेणीतील दहा तर २८ ए श्रेणीतील स्थानके आहेत. यात ए-१ श्रेणीतील महत्वाचे असलेल्या मुंबईतील सीएसटी, एलटीटी, कल्याण, दादर या तर महाराष्ट्रातील नागपूर स्थानके आहेत. देशभरातील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या कामांना गती देण्यासाठी आता या कामात रुची दाखवणाऱ्या विकासकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाकडून अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.
>ए-१ श्रेणीतील स्थानके
सीएसटी, एलटीटी, पुणे,नागपूर, कल्याण,दादर, ठाणे, सोलापूर, मुंबई सेन्ट्रल (मेन), वांद्रे टर्मिनस
ए श्रेणीतील स्थानके
अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, कुर्डूवाडी, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर शिर्डी, शेगाव, अहमदनगर, दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारशहा, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नागरसोल, परभणी जक्शन, गोंदिया
पुनर्विकासातून सुविधा
स्थानकाच्या इमारतीचा पुनर्विकास करताना आदर्श असे स्थानक निर्माण केले जाईल.
स्थानकातील प्रवेशव्दार हे फेरीवाला मुक्त करुन मोकळे ठेवले जातील.
प्लॅटफॉर्मची लांबी व रुंदी वाढवतानाच पादचारी पुलांचीही रुंदी वाढवण्यावर भर
स्वच्छ व आधुनिक असे वॉश रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, इंटनरेट, एटीएम उभारले जाईल.
स्थानक हद्दीत शॉपिंग, हॉस्पिटल, फूड कोर्ट उभारणार
हेलिपॅड
परिसरात पार्किंगची उत्तम सोय
>रेल्वे बोर्डाचे सदस्य (वाहतूक) मोहम्मद जमशेद हे मुंबई दौऱ्यावर असताना ए-१ व ए श्रेणीतील स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार असल्याचे सांगतानाच सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली होती. यात मुंबईतील स्थानकांचाही समावेश होता.