३८२ जवानांची ‘तोपची तुकडी’ सज्ज : नाशिक तोफखाना केंद्राच्या जवानांनी घेतली निष्ठेने देशसेवेची शपथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 02:57 PM2017-08-26T14:57:05+5:302017-08-26T16:12:52+5:30
‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’
नाशिक : ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी ‘कसम’ तोफखाना केंद्राच्या ३८२ जवानांनी दिमाखात सशस्त्र संचलन करीत वरुणराजाच्या साक्षीने घेतली.
निमित्त होते, देशाच्या सर्वात मोठ्या अशा तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोडच्या शपथविधी सोहळ्याचे ! यावेळी ४४ आठवड्यांचे अवघड सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करत ३८२ जवानांनी बटालियन देशसेवेसाठी सज्ज झाली.
भारतीय सैन्याच्या पाठीचा कणा मानल्या जाणाºया भारतातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र म्हणून ओळख असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्रातील सैन्यदलात भरती झालेल्या ३८२ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे प्रशिक्षण पूर्ण केले. ही तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्यदलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहे. या जवानांचा सामूहिक शपथविधी सोहळा शनिवारी (दि.२६) मैदानावर तोफखाना केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संचलन समीक्षक म्हणून पंजाब-हरयाणा-हिमाचलप्रदेशचे सब कमान्डर मेजर संजीव चौधरी उपस्थित होते. ‘शेर-ए-जवान’ ही वैशिष्ट्यपूर्ण धून वाजवत लष्करी बॅण्डच्या पथकासोबत मैदानावर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात आगमन झाले. दरम्यान, चौधरी हे सलामी मंचावर येताच जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. कवायत मैदानाला खुल्या जिप्सी जीपमधून फेरी मारत संचलनाच्या तयारीचे निरीक्षण केले. लष्करी बॅण्डच्या तालावर जवानांच्या तुकडीने यावेळी सशस्त्र संचलन लष्करी थाटात सादर केले.
यावेळी चौधरी म्हणाले, आपण जरी वेगवेगळ्या प्रांताचे रहिवासी असलो आणि विविध भाषा बोलत असलो तरी आता तुम्ही हे सर्व विसरुन केवळ आपण भारताचे सैनिक असून आपला धर्म देशसेवा अन् सैनिक हीच आपली जात असल्याचे लक्षात घ्यावे. तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पुर्ण कारकिर्दित लक्षात ठेवून वर्तणूक करावी. कुठल्याही प्रकारचा राजकिय विचार मनात न आणता शारिरिक-मानसिकदृष्ट्या सक्षम राहून देशसेवेत भरीव योगदान द्यावे. तसेच एकात्मता व सांघिक कामगिरीचा सातत्याने प्रयत्न करावा, असा गुरूमंत्र यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर जी.एस.बिंद्रा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व नवसैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.