गौणखनिज घोटाळ्यातील ३९ ग्रामसेवक निलंबित

By admin | Published: June 10, 2016 09:49 PM2016-06-10T21:49:55+5:302016-06-10T21:49:55+5:30

सोलापूर जिल्हा परिषदेच्या गौणखनिजच्या निधीत गैरप्रकार करणाऱ्या ३९ ग्रामसेवकांवर निलंबनाची तर चार ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत

39 Gramsevaks suspended in the mining scam | गौणखनिज घोटाळ्यातील ३९ ग्रामसेवक निलंबित

गौणखनिज घोटाळ्यातील ३९ ग्रामसेवक निलंबित

Next

लोकमत वृत्तमालिकेचा दणका : चौघांवर फौजदारी; १९७ ग्रामसेवकांची विभागीय चौकशी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या गौणखनिजच्या निधीत गैरप्रकार करणाऱ्या ३९ ग्रामसेवकांवर निलंबनाची तर चार ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. १९७ ग्रामसेवकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून, माळशिरसचे तत्कालीन गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांच्या निलंबनाची तर बार्शी व करमाळ्याच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सीईओ अरुण डोंगरे यांनी सांगितले. याबाबत लोकमतने वृत्तमालिकेच्या माध्यमातून हा घोटाळा उजेडात आणला होता़
सोलापूर जिल्हा परिषदेला २०१३-१४ मध्ये शासनाकडून गौणखनिजचा ७६ कोटी २६ लाख रुपये इतका निधी आला होता. हा निधी ग्रामपंचायतींना दिला होता. ग्रामपंचायतींनी शासनाच्या सूचनेनुसार खर्च करण्याऐवजी झाडे तोडणे, मुरुम टाकणे व अन्य कामे दाखवून खर्ची टाकला. ही बाब जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी उघडकीला आणली व चौकशीसाठी तत्कालीन सीईओ सुरेश काकाणी यांच्याकडे मागणी केली. सदस्य पाटील यांनीच चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केल्याचे पुरावे प्रशासनाकडे दिले होते. त्यानंतर सीईओंनी पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम दिलेल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निधी खर्चाची चौकशी केली. विस्तार अधिकाऱ्यांसह लेखा विभागाचा कर्मचारी व अन्य एक अशी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. त्यांच्या तपासणीत गंभीर दोष आढळले होते. यामुळेच संजय पाटील यांनी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार सीईओ अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी अतिशय गंभीर आढळलेल्यांवर कारवाई केली.
यांच्यावर झाली कारवाई :
- उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठेचे ग्रामसेवक आर. ए. म्हेत्रे, कळमणचे आर. एम. कांबळे, हिप्परग्याच्या व्ही. एल. बंदपट्टे व साखरेवाडीचे के. डी. माने यांच्यावर गंभीर बाबी आढळल्याने फौजदारी गुन्हे दाखल केले असून, या चौघांनाही निलंबित केले आहे.
- मोहोळ तालुक्यातील मिरीच्या एफ. जी. शेख, नजीकपिंपरीचे पी. एस. माने, नरखेडचे एम. के. तांबिले, पोखरापूरचे एन. आर. माने हे निलंबित
- करमाळा तालुक्यातील कारंजेचे ए. आर. शिंदे, पोथरेचे नामकुडे, कोंढारचिंचोलीचे व्ही. एस. गवळी, खडकीचे डी. एन. निकम, बिटरगावचे एल. ए. पेठे, खातगावचे एस. एम. इंगळे, रामवाडीचे एन. डी. पांडव, पुनवरचे के. के. वसावे, निमगाव (ह)चे पी. एम. मोकाशी, आळजापूरचे ए. व्ही. गायकवाड हे निलंबित
- माळशिरस तालुक्यातील इस्लामपूरचे पी. एस. दुधाळ, मिरीचे ए. एस. शिंदे, खळवेचे तोडकर, वेळापूरचे एस. पी. शिंदे, दहिगावचे बी. एस. गोरे, नेवरेचे एस. एस. मुलाणी, उंबरे(द)चे एस. एस. वगरे आदी निलंबित
- सांगोला तालुक्यातील कमलापूरचे एस. बी. कसबे, अनकढाळच्या एस. जी. जावीर, राजुरीच्या ए. एन. हिप्परकर आदी निलंबित
- बार्शी तालुक्यातील वैरागचे ए. एल. काटे, नारीचे जी. एम. सुरवसे, कारीचे एस. एस. खोबरे, उपळे (दु)चे बी. के. हंगीरगेकर, आगळगावचे टी. जे. अंधारे, शेळगाव (आर)चे बी. एल. जगताप, पांगरीचे व्ही. व्ही. माळकर आदींना निलंबित केले आहे.
- मंगळवेढा तालुक्यातील बठाणचे जी. एम. जगताप, माढा तालुक्यातील निमगाव (टें)चे टी. आर. पाटील, टाकळी (टें) एच. एस. मोहिते, चांदजचे एस. जी. धायगुडे आदींवर निलंबनाची कारवाई केली.


माळशिरसच्या गटविकास अधिकाऱ्यांचे निलंबन
एकाच वेळी मोठी व रोख स्वरुपात, बेअरर धनादेशाद्वारे पैसे खर्च करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. माळशिरसचे तत्कालीन गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांच्यावर निलंबनाची तर बार्शी व करमाळ्याच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची शिफारस सीईओंनी केली आहे.


माझी लढाई कोणा व्यक्तीविरोधात नाही. एकेएका गावाला कोटीपेक्षा अधिक निधी आला होता. त्यातून गावाचे चित्रच पालटण्याची संधी होती; मात्र तसे न करता अधिकारी, पदाधिकारी व ग्रामसेवकांनी निधीची वाट लावली. चुकीच्या पद्धतीने निधी खर्च करण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहणार आहे.
-संजय पाटील
जि. प. सदस्य व तक्रारदार


कोणाचीही गय करण्याचा प्रयत्न केला नाही. जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यापुढेही चौकशीत जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तत्कालीन सरपंच व गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल.
-अरुण डोंगरे
सीईओ⁠⁠⁠⁠

Web Title: 39 Gramsevaks suspended in the mining scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.