394 पोलीस उपनिरीक्षक सेवेत; १२० व्या सत्राचा दीक्षान्त : शीतल टेंभे सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीची मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 11:00 AM2022-06-26T11:00:17+5:302022-06-26T11:01:18+5:30
सर्वाधिक २०६ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, त्यानंतर मराठवाड्यातील ११०, विदर्भ ४७, उत्तर महाराष्ट्र २२ व कोकणातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधील १२० व्या सत्रातील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षान्त सोहळा शनिवारी पार पडला. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक राजेश कुमार यांनी या दीक्षान्त सोहळ्यात प्रशिक्षणार्थींना शपथ दिल्यानंतर ३९४ पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस तुकडी राज्याच्या सेवेत दाखल झाली आहे. यात सर्वाधिक २०६ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, त्यानंतर मराठवाड्यातील ११०, विदर्भ ४७, उत्तर महाराष्ट्र २२ व कोकणातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान सर्वाधिक गुणांसह सर्वोत्तम प्रशिक्षणार्थींचा सन्मान मिळविणाऱ्या शीतल टेंभे यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषक व सिल्व्हर बटन आणि मानाची रिव्हॉल्व्हर देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय क्रमांकावर असलेल्या संध्याराणी देशमुख यांना सर्वोत्तम महिला प्रशिक्षणार्थी पारितोषिकासह अहिल्याबाई होळकर चषक प्रदान करून गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर द्वितीय क्रमांकावरील सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी संध्याराणी देशमुख यांच्या नेतृत्वात १२० व्या सत्रातील प्रशिक्षणार्थींनी निष्क्रमण संचलन करीत अकादमीचा निरोप घेतला.
सोलापूरला मानाचे स्थान -
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत गत वर्षभरातील प्रशिक्षणादरम्यान ३९४ प्रशिक्षणार्थींमधून सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सावडी येथील शीतल टेंभे हिने सर्वाधिक गुण मिळवून सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळवत मानाची रिव्हॉल्व्हर पटकावली, तर करमाळा तालुक्यातील वांगी नं. २ येथील संध्याराणी देशमुख यांनी द्वितीय सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा मान मिळविला. विशेष म्हणजे संध्याराणी देशमुख यांना द्वितीय पारितोषिक मिळाले असले तरी त्यांनी दीक्षान्त संचलनात २७८ पुरुष व ११६ महिला असे सर्व ३९४ प्रशिक्षणार्थींचे नेतृत्व करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.