नवीन सदनिका देण्याच्या नावाखाली तीन लाख ९५ हजारांची फसवणूक
By Admin | Published: July 2, 2017 10:22 PM2017-07-02T22:22:50+5:302017-07-02T22:22:50+5:30
व्हीआरपी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी मेधा गवारे आणि विक्रम सपाटे यांनी वर्तकनगर येथील असलम मसलत यांची तीन लाख 95 हजारांची फसवणूक केली
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 2 - नवीन घर देण्याच्या नावाखाली व्हीआरपी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी मेधा गवारे आणि विक्रम सपाटे यांनी वर्तकनगर येथील असलम मसलत यांची तीन लाख 95 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवारे यांना ठाणे महापालिकेने जुन्या रहिवाशांच्या केवळ बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांना कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले नसताना त्यांनी वर्तकनगरच्या भीमनगर भागात राहणाऱ्या असलम यांच्या घराचे सर्वेक्षण करतेवेळी ठाणे महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनेतून त्यांना त्यांच्या कच्च्या घराऐवजी नवीन पक्के घर मिळवून देऊ, अशी बतावणी केली. त्यासाठी त्यांच्याकडून 2008 ते 2010 या कालावधीत तीन लाख 95 हजारांची रक्कमही घेतली. त्यानंतर त्यांना ठाणे महापालिकेचा लोगो असलेली आणि त्यावर ठाणे महापालिका गृह सर्वेक्षण प्रश्नावली असा मजकूर असलेली बनावट पावती देऊन त्यांचा विश्वास मिळविला. परंतु 1 जुलै 2017 पर्यंत पैसे किंवा नवीन सदनिकाही मिळवून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर असलम यांनी याप्रकरणी गवारे आणि विक्रम सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गाळा देण्याच्या नावाखाली 50 लाखांची फसवणूक
गाळा घेऊन देण्याच्या नावाखाली कळव्यातील पोपट चौधरी यांच्याकडून सतिश रिचार्ला यांच्यासह तिघांनी 50 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळव्याच्या जुना मुंबई हायवे रोडवरील दत्तवाडीतील साईराम सोसायटीतील रहिवाशी चौधरी यांनी सतिश रिचार्ला यांच्या मध्यस्थीने गाळा मालक शर्मिला कपोते आणि त्यांचा भाऊ हिरोज कपोते यांना त्यांचा गाळा खरेदीसाठी 30 लाख रोख आणि आरटीजीएस मार्फत 20 लाख असे 50 लाख रुपये दिले. जैनम आर्केडच्या तळमजल्यावर शॉप क्रमांक चार मध्ये झालेल्या गाळा खरेदीच या व्यवहारानंतर चौधरी यांना सतिश आणि कपोते बंधू भगिनीने गाळाही नावावर केला नाही आणि पैसेही परत केले नाही. अखेर याप्रकरणी त्यांनी 1 जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे हे अधिक तपास करीत आहेत.