मध्य रेल्वेवर ३९७ कोटींची कामे
By admin | Published: October 23, 2014 04:21 AM2014-10-23T04:21:20+5:302014-10-23T04:21:20+5:30
रोड ओव्हर ब्रिज, लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, तांत्रिक कामे, नवीन पादचारी पूल अशी एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांची कामे केली
मुंबई : मध्य रेल्वेकडून येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जाणार आहेत. रोड ओव्हर ब्रिज, लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, तांत्रिक कामे, नवीन पादचारी पूल अशी एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांची कामे केली जाणार असून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी एक बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला आणि यात अनेक कामांसाठी सकारात्मक विचार करत ते मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सीएसटी स्थानकात २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई विभागात असणारे लाइन क्रॉस गेट बंद करून त्याऐवजी रोड ओव्हर ब्रिजही बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी ५२ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
महत्त्वाची बाब म्हणजे काही स्थानकांवर असणाऱ्या पादचारी पुलांची दुरवस्था झाली असून त्याऐवजी नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. आसनगाव, दिवा, मुंब्रा, भांडुप, मस्जिद, शिवडी आणि दादर स्थानकात बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलांचा एकूण खर्च हा १५ कोटी रुपये असेल.
मध्य रेल्वेकडून सिग्नल आणि दूरसंचार, पुलांचे नूतनीकरण आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्ते सुरक्षा कामांसाठीही १३0 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अशा एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांच्या कामांचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला असून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)