अंबाजोगाई येथे भरणार 39वे मराठवाडा साहित्य संमेलन
By Admin | Published: June 12, 2017 09:58 PM2017-06-12T21:58:11+5:302017-06-12T22:17:15+5:30
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा रविवारी (दि.11) अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा रविवारी (दि.11) अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली. बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने 39वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. बैठकीला मसापचे कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष भास्कर बडे, दगडू लोमटे, अंबाजोगाई मसाप शाखाध्यक्ष अमर हबीब, बीड जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण विभागाचे सभापती राजेसाहेब देशमुख, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. ह्यया संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे. लिहित्या शिक्षकांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती दादा गोरे यांनी दिली. शालेय अभ्यासक्रमातील अडचणी व सुधारणा या विषयावर परिसंवाद घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सप्टेंबर महिन्यापासून मसापचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.
गतवर्षी 38वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते. अंबाजोगाईमध्ये 1982 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनही तेथे झाले होते. मात्र, अंबाजोगाईमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.