अवैध वाळूउपसा करणाऱ्या ४ बोटी जिलेटिनने फोडल्या

By Admin | Published: May 21, 2016 01:04 AM2016-05-21T01:04:36+5:302016-05-21T01:04:36+5:30

भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवून, जिलेटिनचा स्फोट करून ४ बोटी उडवून दिल्या.

4 boats have been set ablaze by the illegal sandstorm | अवैध वाळूउपसा करणाऱ्या ४ बोटी जिलेटिनने फोडल्या

अवैध वाळूउपसा करणाऱ्या ४ बोटी जिलेटिनने फोडल्या

googlenewsNext


इंदापूर : तहसीलदार वर्षा लांडगे यांनी आज चांडगाव येथील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवून, जिलेटिनचा स्फोट करून ४ बोटी उडवून दिल्या. एक जेसीबी ताब्यात घेतला आहे. वाळूमाफियांना १२ लाख रुपयांच्या नुकसानीचा दणका दिला आहे.
दुपारी तीन वाजता सुरु झालेली ही कारवाई सहा वाजेपर्यंत चालली होती. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्यासमवेत लोणी देवकरचे मंडलाधिकारी सर्जेराव काळे, काटीचे मंडलाधिकारी तानाजी पवार, इंदापूरचे मंडलाधिकारी संतोष अनगिरे, तलाठी मदन भिसे, अजित पाटील, शिवाजी जगताप, दीपक पवार, गोरख बारवकर, एन. एच. पठाण, शिवाजी खोसे, राहुूल पारेकर यांच्या भरारी पथकाने या कारवाईत भाग घेतला होता. यासंदर्भात तहसीलदार लांडगे म्हणाल्या, की कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बेकायदेशीर वाळूउपसा व वाहतुकीवर कारवाई करणार आहे. (वार्ताहर)
>लोणी काळभोरला अवैध वाळूउपसा; दोन ट्रॅक्टर, एक ट्रक जप्त
हवेलीच्या महसूल पथकाने हिंगणगाव परिसरात विनापरवाना, अवैध वाळू व मातीचा उपसा करणारे दोन ट्रॅक्टर, एक ट्रक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
नायब तहसीलदार समीर यादव, उरुळी कांचनचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे व खेड शिवापूर येथील मंडलाधिकारी शेखर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. पकडलेल्या दोन ट्रॅक्टरकडून सुमारे ८ ते १० लाख रुपये दंड वसूल होण्याची शक्यता आहे.
हवेली महसूल विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची शहानिशा करण्यासाठी पथक गेले होते. या वेळी हिंगणगाव परिसरातील नदीशेजारील गट नंबर ३१ मधील ओढ्यातून माती व वाळू उपसण्याचे काम सुरू होते. दोन डम्पिंग ट्रॅक्टर कार्यरत होते. ते अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
केसनंद परिसरात आले असता एक वाळूवाहतूक करणारा अवैध ट्रक या पथकाच्या हाती सापडला असून, त्यामध्ये सुमारे तीन ते साडेतीन ब्रास वाळू असल्याने तोही लोणीकंद पोलिसांत जमा केला आहे. प्रतिब्रास २६ हजार ६२० रुपये प्रमाणे या वाहनांकडून दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: 4 boats have been set ablaze by the illegal sandstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.