४ मुले बुडाली
By admin | Published: June 11, 2017 12:58 AM2017-06-11T00:58:28+5:302017-06-11T00:58:28+5:30
चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रत्येकी दोन सख्खे भाऊ यात बुडाल्याने
- लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) : चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रत्येकी दोन सख्खे भाऊ यात बुडाल्याने दोन परिवारावर मोठा आघात झाला.
गणेश सिध्दाप्पा जुमाळे (वय ६), धीरज सिध्दाप्पा जुमाळे (वय ८, दोघे रा. कासार घाट, पंढरपूर), श्रीपाद सुनील शहापूरकर (वय ८) व सौरभ सुनील शहापूरकर (वय ६, रा. भांडे गल्ली, पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.
हे चार जणि आणि केदार सिध्दाप्पा जुमाळ असे पाचजण चंद्रभागा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. केदार हा नदी पात्रात न उतरता वाळवंटातच थांबला होता. चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. केदारने घरी जाऊन पालकांना सांगितल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बालकांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र ही मुले उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नदीपात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मुलांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
गोव्यात खंदकात दोघे बुडाले
वास्को (गोवा) : झरींत-झुआरीनगर येथील औद्योगिक वसाहतीत एका खंदकातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. रोहित पांडे ( ८) व समीर मलबरी ( १२) अशी मृतांची नावे आहेत. औद्योगिक वसाहतीत सुमारे दहा फू ट खोल खंदक खणून ठेवला होता़ दोन दिवस पडलेल्या पावसाचे पाणी त्यात भरले होते. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झरींत भागातील काही मुले या खंदकात उतरली. पाणी गढूळ असल्यामुळे खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले.