४ मुलांसह पत्नीच्या खुन्याची फाशी स्थगित; फेरविचार याचिकेवर नव्याने सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 02:04 AM2018-11-22T02:04:37+5:302018-11-22T02:05:16+5:30
पत्नी व चार मुलांचे खून करून त्यांचे मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या सुदाम ऊर्फ राहुल काशिराम जाधव या नांदेड जिल्ह्यातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा खुली सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.
मुंबई : पत्नी व चार मुलांचे खून करून त्यांचे मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या सुदाम ऊर्फ राहुल काशिराम जाधव या नांदेड जिल्ह्यातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा खुली सुनावणी घेण्याचे ठरविले आहे.
न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने अलीकडेच हा आदेश दिला. फेरविचार याचिकेवर जानेवारीच्या दुसºया आठवड्यात सुनावणी होईल व निर्णय होईपर्यंत सुदामची फाशी स्थगित राहील.
नागपूर कारागृहात असलेल्या ट्रक ड्रायव्हर असलेल्या सुदामने औरंगाबाद कारागृहात पाठविण्यासाठी अर्ज केला आहे. त्याची दुसरी पत्नी अनिता, तिचा एक मुलगा व एक मुलगी तसेच पहिल्या पत्नीचा एक मुलगा व एक मुलगी असे पाच जणांचे नांदेड जिल्ह्यातील रुपला तांडा येथे १९ आॅगस्ट २००७ रोजी रात्री खून करून त्यांचे मृतदेह जुनापाणी तलावात फेकून दिले होते.
खून व पुरावा नष्ट करण्याबद्दल सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (न्या. पी.व्ही. हरदास व न्या. रवी के. देशपांडे) २२ एप्रिल २००९ रोजी कायम केली. याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालायने जुलै २०११ मध्ये व फेरविचार याचिकाही जुलै २०१२ मध्ये फेटाळली होती.
असे दुसरे प्रकरण
सुदामने अर्ज केल्याने आता आधी फेटाळलेल्या त्याच्या फेरविचार याचिकेवर नव्याने खुली सुनावणी होईल. गेल्या महिन्यात याच खंडपीठाने नाशिकमधील फाशीच्या ४ कैद्यांचीही फाशी स्थगित करून त्यांच्या फेरविचार याचिकांवर खुली सुनावणी करण्याचे ठरविले होते.