कोकणपट्ट्यात ४ लाख क्विंटल भात पडून

By admin | Published: May 26, 2015 11:44 PM2015-05-26T23:44:44+5:302015-05-26T23:44:44+5:30

जिल्ह्यात २४ हजार क्विंटल भात शिल्लक : एफसीआयने नाकारल्याचा परिणाम; साठा संपवण्यासाठी ई-टेंडरची उपाययोजना

4 lakh quintals of paddy in Konkan Patta | कोकणपट्ट्यात ४ लाख क्विंटल भात पडून

कोकणपट्ट्यात ४ लाख क्विंटल भात पडून

Next

मिलिंद पारकर- कणकवली -भात उचल न झाल्याने जिल्हाभरातील भातसाठ्याचा आणि पुन्हा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी कॉँग्रेसने गोदामे रिकामे करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन वर्षांत यावर नेमकी उपाययोजना झाली नसल्याने प्रश्न जटील झाला असून ई-टेंडरचा उपाय काढून प्रशासन स्वस्थ बसले आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी विक्री संघ व मिलरकडे पडून आहे.
भात साठ्याची उचल न झाल्याने हळूहळू सिंधुदुर्गात प्रश्न जटील बनला असून त्यावर राजकारण पेटले आहे. पंधरा दिवसांत यावर उपाय काढू असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी पुढे कोणतीच हालचाल केली नाही. भाड्याची गोदामे घेण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, तसाही प्रयत्न झाला नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पड्या भावाने भात विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.


भातसाठ्याची प्रक्रिया
आॅक्टोबर महिन्यापासून खरेदी-विक्री संघात शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. त्यानंतर भरडाईसाठीची निविदा काढली जाते. बॅँक गॅरंटी, करारनामा आदी पूर्तता करून बॅँक गॅरंटीएवढे भात मिलरला दिले जाते. भात भरडाई झाल्यानंतर तयार झालेला तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे तपासणीसाठी जातो. तेथे तांदळाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाच्या मान्यतेने तो तांदूळ जमा केला जातो. तेवढ्याच रकमेचा भात परत मिलिंगसाठी दिला जातो.



देवगड तालुक्यात खरेदी
देवगड तालुक्यात मूळात भात खरेदी कमी झाली होती. त्यामुळे तेथे जागा शिल्लक होती. त्यामुळे यावेळी देवगडमध्ये ४७२ क्विंटल भात खरेदी झाली आहे. मात्र, आता तेथेही क्षमता संपल्याने भात खरेदी थांबणार आहे.

१३१० चा दर ९०० रूपयांवर
२०१३-१४ मध्ये भाताचा दर १३१० रूपये होता. मात्र, एफसीआयकडून नाकारण्याचा प्रकार झाल्यानंतर मिलरकडून भाताची उचल बंद झाली. साठलेले भात आता खराब झाले आहे. कोणीही उचल करत नसल्याने शासनाने ९०० रूपयांवर दर आणून ठेवला आहे. आता शासनाने ई-टेंडर काढून भात उचल करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

एफसीआयकडून नाकारला
आॅक्टोबर २०१३ मधील घेण्यात आलेला भात भरडाई केल्यानंतर तुकडा जास्त पडतो या कारणास्तव भारतीय अन्न महामंडळाकडून नाकारण्यात आला. पूर्ण कोकण पट्ट्यात सुमारे ४ ते ५ लाख क्विंटल भात खरेदी-विक्री संघ आणि मिलरकडे पडून आहे. सिंधुदुर्गातील २० गोदामांमध्ये मिळून सुमारे २४ हजार क्विंटल भात पडून आहे.


भातसाठ्याने खत ठेवायला जागा अपुरी
आॅक्टोबर पासून पहिले तीन महिने भात खरेदी करून ठिकठिकाणच्या खरेदी-विक्री संघांच्या गोदामांमध्ये साठवण केली जाते. त्यानंतर मिलरकडून पुढील तीन महिन्यात भात उचल होत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर आलेले खत ठेवण्यासाठी जागा होते. मात्र, आता भातसाठ्याचा प्रश्न निकाली न निघाल्याने खत ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आली आहे. जिल्हातील गोदामांमध्ये ५० ते १५० मेट्रिक टन एवढीच जागा आहे.


जास्त दिवस ठेवल्यास तुकडा
आता खरेदी-विक्री संघाच्या गोदामांमध्ये जमा असलेला भात हा बहुतांश मसुरी, इंद्रायणी, कोमल या जातीचा आहे. वेळच्या वेळी भातावर प्रक्रिया करून तांदूळ केल्यास भाताचा तुकडा पडत नाही. परंतु जास्त दिवस भात तसेच पडून राहिल्यानंतर प्रोसेसिंग केल्यावर तुकडा पडण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: 4 lakh quintals of paddy in Konkan Patta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.