राज्यात पावसाचे २ बळी, कोल्हापूरला महापुराचा धोका टळला; मुसळधारेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:47 AM2019-09-09T01:47:22+5:302019-09-09T06:26:27+5:30
सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
मुंबई/नागपूर/कोल्हापूर: गेले तीन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्टÑासह विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरला पुराचा संभाव्य धोका टळला आहे. मात्र दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हावामान खात्याने दिला आहे. विदर्भात एकजण ठार झाला असून पुरामध्ये ४९ जणावरे ठार झाली तर मराठवाड्यात वीज पडून एक मुलगी ठार झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्या धोकापातळीकडे वाटचाल करीत असतानाच रविवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली. दुपारनंतर सातपैकी तीन दरवाजे बंद होऊन पंचगंगा ३९ फूट या इशारा पातळीवर येऊन स्थिर झाल्याने महापुराचा धोकाही टळला. कागल-मुरगूड मार्गासह कसबा बीड, महे पुलावर पाणी आल्याने करवीर तालुक्यातील ४० गावांचाही संपर्क तुटला. अन्य २२ मार्गही आधीपासूनच बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.
सांगली व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणातून ६९ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी पुन्हा वाढ सुरू झाली आहे.
विदर्भात ४९ जनावरे दगावली
भामरागड शहरासमोरील पुराचा वेढा सलग तिसºयाही दिवशी कायम आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे रविवारी पहाटे जनावरांना विजेचा धक्का लागल्याने ४९ जनावरे ठार झाली. शेजारच्या घरावर भिंत कोसळल्याने एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी पहाटेघडली.
वीज पडून मुलीचा मृत्यू
शेतात मूग तोडणी करीत असताना अंगावर वीज पडल्याने परभणी जिल्ह्यातील धानोरा (देगाव) येथील माधुरी पांडूरंग रणबावळे (१२) ही मुलगी मरण पावली.
मुसळधारेचा इशारा
९ व १० सप्टेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला आहे़