गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 07:01 AM2019-11-04T07:01:36+5:302019-11-04T07:02:27+5:30
२०१९ मध्ये चार वादळे : सागरी आपत्ती जाहीर करण्याची मच्छीमारांची मागणी
सागर नेवरेकर
मुंबई : वातावरण बदलामुळे गेल्या दहा वर्षांत अरबी समुद्रात १७ वादळे येऊन धडकली. या वर्षी समुद्रात चार मोठी वादळे येऊन गेली. या वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित सागरी मासेमारी आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
समुद्रात या पूर्वी १० वर्षांमध्ये चार ते पाच वादळे येत होती, परंतु २०१० ते २०१९ दरम्यान अरबी समुद्रात १७ वादळे येऊन गेली, तर फक्त २०१९ मध्ये अरबी समुद्रात एकूण चार वादळे येऊन गेली. एकाच वेळी समुद्रात दोन वादळे ही १२५ वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर, या वर्षी अरबी समुद्रात ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी दोन वादळे एकाच वेळी धडकली. या वादळांमुळे शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर मच्छीमार बांधवांचेही नुकसान झाले असून, आॅगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडला आहे. त्यामुळे मच्छीमारांवर आर्थिक आपत्ती ओढावली गेली आहे. शासनाने मच्छीमार बांधवांच्या आर्थिक नुकसानाकडे लक्ष देऊन त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमार संस्था व संघटनांनी केली आहे.
अद्याप ठरवले नाहीत निकष
जागतिक तापमानात वाढीमुळे अनेक नैसर्गिक संकटे एकापाठोपाठ येऊन धडकत आहेत. मनुष्यच कुठेतरी याला जबाबदार आहे. अरबी समुद्रात जी मोठी वादळे निर्माण होत आहेत. ती पूर्वी पॅसिफिक महासागरात दिसून यायची. या वर्षी अरबी समुद्रात चार मोठी वादळे भारतीय भूखंडामध्ये येऊन गेली आहेत. चार वादळांपैकी तीन वादळे ही हंगामामध्येच येऊन गेली आहेत. त्यामुळे मच्छीमारावर उपासमारीची वेळ आली आहे. दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसान भरपाईची फक्त चर्चा केली जाते. मात्र, अद्यापही कोणतेही निकष, श्रेणी ठरविले गेलेले नाहीत.
- हेमंत गौरीकर, अध्यक्ष,
रायगड जिल्हा मच्छीमार कृती समिती.
अरबी समुद्रात आलेली शतकातील वादळे
वर्षे वादळांची
संख्या
१८०० ५
१९००-४९ १०
१९५० ३
१९६० ६
१९७० ११
१९८० २
१९९० ६
२००० ५
२०१०-१९ १७
उपासमारीची वेळ
राष्ट्रीय मच्छीमार परिक्षेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, मच्छीमारांसाठीच्या सुविधा, विविध योजना, आर्थिक मदत आणि विकास इत्यादींमध्ये काळानुसार बदल होत गेले, परंतु जास्त व्याज आकारणाऱ्या योजनेतून कित्येक मच्छीमार भरडले गेले. आता अरबी समुद्रात पाठोपाठ येणाºया वादळांमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वादळाची चाहुल लागली की, अगोदरच हवामान खाते आणि कोस्ट गार्ड मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून रोखतात, तसेच मच्छीमारांच्या मोबाइलवर मेजेस पाठवितात. नैसर्गिक आपत्ती काळात ज्या शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात, तशा मच्छीमारांसाठी कोणत्याही सुविधा सरकारकडून दिल्या जात नाहीत.