विक्रमगडमध्ये ४० दिवसाचेच पाणी
By admin | Published: February 13, 2017 03:19 AM2017-02-13T03:19:02+5:302017-02-13T03:19:02+5:30
तालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते.
राहुल वाडेकर / विक्रमगड
तालुक्यात मार्च महिन्या पासून काही गाव पाड्यात पाण्याचा खड-खडात सुरु होण्यास सुरुवात झाली असून मे महिन्यापर्यंत तर काही गाव पाड्यात बिकट अवस्था होते. सध्याच्या पेयजल साठ्याच्या पहाणीनुसार तालुक्यातील बहुतेक गावात जेम तेम ४० दिवस पाणी पुरेल इतकाच पाण्याचा साठ शिल्लक आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नदी- नाले आटण्यास सुरवात झाली असून विहिरींनी तळ गाठले आहेत. दरवर्षी पाणी टंचाई ग्रस्त असणाऱ्या गाव- पाड्यांना कायम स्वरूपी उपाय योजना करण्याचे तर दूरच पण गेल्या ११ वर्षा पासूनच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण आवस्थेत आहेत.
तालुक्यातील १० ग्राम पंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या नळपाणी योजना आजपर्यंत आर्धावत आवस्थेत आहेत. यातील ६ योजना ११ वर्षा पासून तर ४ योजना ४ वर्षांपासून रखडलेल्या असल्याने या योजनाच्या कामात सावळा गोधळ असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत या योजनानसाठी तब्बल १ कोटी ९७ लाख ५९ हजार रु खर्च झाला आहे. तालुक्यातील २००४-०५ साला पासून पाणी पुरवठा योजनांना साठी देहर्जे गावातील योजनेसाठी १५.८५ लाख रुपये निधी मंजूर होता, त्या पैकी १२.६१ लाख वितरीत करण्यात आले आहेत. साखरेगावासाठी २२.९९ लाख निधी मंजूर होता त्यापैकी १७.७३ लाख निधी वितरीत करण्यात आला. केव गावसाठी २१.६१ लाख रुपये निधी मंजूर होता त्यापैकी ८.६१ लाख रुपये निधी वितरीत
करण्यात आला. या योजनात अपहार झाल्याने आजही न्याय प्रविष्ठ असल्याने गेल्या ११ वर्षा पासून रखडल्या आहेत.
२००५-६ साली दादाडे ( कमळ पाडा) गावासाठी २३.४ लाख रुपये निधी मंजूर होता त्या पैकी ८.५९ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जांभा- पोचाडा गावासाठी १५.८८ निधी मंजूर होता. त्या पैकी ६.६१ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. हातने गावा साठी १५.८८ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ६.७९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. तर २०११-१२ साली खांड-उघानीपाडा गावासाठी ४६.६४ लाख निधी मंजूर होता. त्या पैकी ३९.८८ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. टेटवाली गावासाठी ३४.२४ लाख निधी मंजूर होता त्यापैकी २९.२७ लाख निधी वितरीत करण्यात आला. उपराले गावासाठी ४५.४४ लाख निधी मंजूर होता त्या पैकी ३८.८५ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. उटावली- पोटखल साठी ४४.९९ लाख निधी मंजूर होता त्या पैकी २५.६४ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.
आशा साखरे, केव, खांड-उघानीपाडा, दादाडे जांभा, हाताने, टेटवली, उपराले, उटावली, देहर्जे या गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. या साठी निधी सुद्धा वितरीत करण्यात आला आहे. या तील सहा योजनांचे काम २००४-५ मध्ये तर चार योजना २०११-१२ मध्ये हाती घेण्यात आल्या. यासाठी निधी वितरीत करण्यात आला. या साठी झालेल्या कामासाठी तब्बल २ कोटीच्या आसपास निधी ही खर्च झाला. अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे. मात्र आजही या काही पाणी पुरवठा योजनेतील काही गावात नळाला पाणी आजतागायत आले नाही. यातील देहर्जे, साखरे, केव या तीन योजनातील अपहार झाल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या योजना या ना त्या कारणाने अद्याप रखडलेल्या आहेत.
पाणी पुरवठा विभागाकडून असा युक्तिवाद
या योजनाचा निधी ग्राम पंचायातींना देण्यात येत असून पाणी पुरवठा विभाग फक्त देखरेखीचे काम करते असा युक्तिवाद पाणी पुरवठा विभाग कडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांशी ग्राम पंचायती सक्षम नसल्याने ठेकेदार नेमून काम करण्यात येते. तरी ही या योजना आजतागायत पूर्ण झाल्या नाहीत. या- ना त्या कारणाने या योजना अपूर्ण असल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी विहीर-नदी- नाल्यांचा आधार घ्यावा लागतो.
योजनाच्या कामात चाल ढकल करून काय साध्य झाले. असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.