महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:11 AM2019-08-12T07:11:00+5:302019-08-12T07:11:31+5:30

महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत.

40 die due to floods; 200 road & 94 bridge still closed | महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद

महापुरामुळे ४० जणांचा मृत्यू; २०० मार्ग, ९४ पूल अजूनही बंद

Next

मुंबई/पुणे/कोल्हापूर : महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्रह्मनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक व्यक्ती सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल २०० रस्ते आणि ९४ पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्टÑातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.
राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, ७० तालुके व ७६१ गावे बाधित झाली आहेत. ४,४७,६९५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या ३२, एसडीआरफच्या ३, लष्कराच्या २१, नौदलाच्या ४१, तटरक्षक दलाची १६ पथके कार्यरत आहेत. २२६ बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे ४० व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर ४८ जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.
पाणी ओसरताच या रस्त्यांची डागडुजी, सफाई करून तातडीने वाहतूक पूर्वपदावर आणायला हवी. राज्यभरातून मनुष्यबळ आणि संसाधने मागवा, पण तातडीने ट्रान्सफॉर्मर आदींची दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावीत. पूरग्रस्त भागातील रस्ते वाहतूक आणि वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.
स्वच्छतेची मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.
‘गोकुळ’मार्फत मोफत दूध
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ डेअरीमार्फत २४ तास मोफत दूध पुरवठा करण्यात येत आहे. येथे कोणीही येऊन दुध घेऊन जाऊ शकतात. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये रुग्णांना मोफत सेवा पुरवीत आहेत.
प्रवीण परदेशींची सांगलीला रवानगी
मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांचा आपत्ती व्यवस्थापनातील अभ्यास आणि अनुभव लक्षात घेत त्यांना तातडीने सांगलीला रवाना होण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. सोमवारी सकाळीच परदेशी सांगलीत दाखल होणार असून तेथूनच या महापुरातील बचावकार्यासह पुढील व्यवस्था सुरळीत करण्याचे काम करणार आहेत.
पूरग्रस्तांसाठी एक ट्रक औषधे रवाना
नागपूर : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी नागपूर उपसंचालक आरोग्य कार्यालयही धावून गेले आहे.
या भागातील पुराचे पाणी ओसरत असल्याने जलजन्य व कीटकजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. तो टाळण्यासाठी या आजाराशी संबंधित औषधांचा
एक ट्रक शनिवारी रवाना करण्यात आला.

रोखीने ५ हजारांची मदत

सरकारकडून ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना १० हजार तर शहरी भागातील पूरग्रस्तांना १५ हजारांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी पाच हजार रुपये मंगळवारपासून रोख व इतर मदत बँकेत जमा केली जाणार आहे. बँकांनी पैसे देताना पूरग्रस्तांकडे पासबुक वा चेकबुक मागू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पूरग्रस्त भागातील ४६९ एटीएम केंद्रांपैकी २१८ केंद्र बंद आहेत. पूरग्रस्तांची बायोमेट्रिक मशीनद्वारे ओळख पटविली जाईल. ओळख न पटल्यास अन्य खातेदारांमार्फत ही ओळख पटविली जाईल, असे पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.

टँकरला जेसीबीचा आधार देत महापुरातून पेट्रोल रवाना

कोल्हापूर शहराला गेला आठवडाभर महापुराने वेढा दिला असल्याने, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गही बंद आहे; त्यामुळे कोल्हापुरात डिझेल-पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने, रविवारी प्रशासनाने महापुराच्या पाण्यातूनच तेलाचे टँकर कोल्हापुरात आणले. जिथे नदीच्या प्रवाहाला जास्त वेग आहे, तिथे टँकर पाण्यातून वाहत जाऊन काही दुर्घटना घडू नये, म्हणून नदीकडील बाजूस पोकलॅन लावून टँकरला आधार दिला जात होता.
 

Web Title: 40 die due to floods; 200 road & 94 bridge still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.