४0 लाखांच्या रोकडसह दरोडेखोर जेरबंद !
By admin | Published: August 4, 2016 12:58 AM2016-08-04T00:58:42+5:302016-08-04T00:58:42+5:30
भरदिवसा सेनगाव येथे लुटली होती बँक; रिसोड पोलीस, शेगाव खोडकेच्या ग्रामस्थांची कामगिरी.
रिसोड (जि. वाशिम),दि. ३: : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील हैद्राबाद बँकेतील कर्मचार्यांना चाकूचा धाक दाखवून भरदिवसा ४0 लाख रुपयांची रोकड लुटून पसार होणार्या तीन दरोडेखोरांना वाशिम जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील ग्रामस्थ व पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेनगाव येथे हिंगोली शाखेतील अधिकारी व कर्मचारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ४0 लाख रुपयांची रोकड महिला कर्मचार्याच्या ताब्यात देत असताना दरोडेखोरांनी चाकूचा धाक ही रक्कम लुटली. या रकमेसह ते टाटा सुमो जीपमधून पसार झाले. ही घटना हिंगोली पोलिसांना समजताच त्यांनी वाशिम मुख्यालयाशी संपर्क साधून नाकेबंदी करण्याच्या सूचना दिल्या. रिसोड पोलिसांनी नाकाबंदी केली. दोन वेगवेगळी पथके दरोडेखोरांच्या शोधात होती. दरोडेखोर सेनगाव येथून आजेगाव मार्गे शेगाव खोडकेकडे जात असल्याची गुप्त माहिती एका पथकाला मिळाली. पोलिसांनी लगेच शेगाव खोडके येथील ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी केली. दरोडेखोरांचे वाहन दिसताच पोलिसांनी तीन किलोमीटर अंतरापर्यंत या वाहनाचा पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलमधून दोन वेळा पोलीस वाहनाच्या दिशेने गोळ्या झाडल्या. तथापि, पोलीस व ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरूच ठेवला व त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी एक दरोडेखोर पळून गेला.
दरोडेखोरांना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी ४0 लाखांची रोकड व टाटा सुमो तसे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. जनार्धन वाघमारे, रा. मांडेगाव, ता. जि. हिंगोली, राजेंद्रसिह महिपालसिंह बाबरी (२५ वर्षे), रा. सद्गुरू नगर बडनेरा व बाबूसिंह टाक, रा. वडाळी जि. अमरावती अशी दरोडेखोरांची नावे आहेत.
चोरलेली 'सुमो' मूर्तिजापूरची !
या गुन्हय़ात दरोडेखोरांनी वापरलेली एमएच ३८- २३७ क्रमांकाची टाटा सुमो जीप दरोडेखोरांनी २ जुलै रोजी मूर्तिजापूर येथून चोरली होती. जनार्धन वाघमारे या आरोपीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून तो पॅरोलवर आला होता, तसेच त्याच्याविरुद्ध खुनाचा
गुन्हाही दाखल आहे.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ कुळवंत, विठ्ठल खुळे, रवींद्र हुंडेकर, गजानन शिंदे, नारायण चंदनशिव, लक्ष्मण पोटे, प्रवीण ढवणे, विनोद घनवट, रोहित ठाकरे, विजेंद्र इंगोले, गजानन पांचाळ, उत्तमराव गायकवाड, नरसिंग हाके, काकडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी ही विशेष कामगिरी बजावली.