जलसंधारणासाठी ४० लाखांचा निधी
By admin | Published: May 18, 2016 01:27 AM2016-05-18T01:27:32+5:302016-05-18T01:27:32+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली
मंचर : रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम विभागासाठी ४० लाख रुपयांच्या निधी संधारणाच्या कामावर खर्च केला जाणार आहे. त्यात कवठे, वाघाळे, अवसरी खुर्द, वाफगाव व माळीण या गावांत प्रत्येकी ५ लाख रुपयांची जलसंधारणाची कामे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात पत्रकार परिषदेला पश्चिम विभाग सल्लागार समितीचे चेअरमन राम कांडगे, बाळासाहेब बेंडे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, एल. झेड. वाळुंज उपस्थित होते.
राम कांडगे म्हाले, संस्थेच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेनुसार १ कोटी ८४ लाख रुपयांचा दुष्काळ निधी जाहीर केला. संस्थेत सेवेत असणाऱ्या सेवकांनी त्यासाठी १ दिवसाचा पगार दिला. आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार माळीण गावातही कामे करण्यात येणार आहेत. बुधवारी माळीण येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. (वार्ताहर)
पश्चिम विभागासाठी ४० लाख रुपयांचा दुष्काळ निधी उपलब्ध झाला आहे. त्याासाठी प्रत्येक शाखेस पाच लाख रुपये रयत शिक्षण संस्था दुष्काळ निधी म्हणून देणार असून, या निधीतून संस्थेच्या विविध दुष्काळी भागातील जवळजवळ ४० शाखांच्या गावांचे परिसरातील कायमस्वरुपी दुष्काळ निवारणाचे काम होणार आहे. कवठे, वाघाळे, अवसरी खुर्द व वाफगाव या गावांमध्ये संस्थेच्या वतीने जलसंधारणाची कामे करण्यास आज सुरुवात झाली.