‘लेक वाचवा’च्या नावे ४० लाखांची उधळपट्टी; अभियानात केवळ थातूरमातूर कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:43 AM2018-01-12T01:43:37+5:302018-01-12T01:44:28+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून शाळा-शाळांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यासाठी राज्यभरात ४० लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही जिल्ह्यातील शाळांनी थातूरमातूर कार्यक्रम वगळता फारसे काही केलेले दिसत नाही.
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून शाळा-शाळांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यासाठी राज्यभरात ४० लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही जिल्ह्यातील शाळांनी थातूरमातूर कार्यक्रम वगळता फारसे काही केलेले दिसत नाही. पैसे देऊन मोकळा झालेला शिक्षण विभागही अभियानाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवत नसल्याचे चित्र आहे.
३ ते २६ जानेवारी या कालावधीत रोज मुलींच्या शिक्षणासंदर्भात उपक्रम राबविण्याच्या सूचना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत. हे उपक्रम राबवून घेण्याची जबाबदारी राज्यातील ४०८ शहर साधन केंद्रांवर (यूआरसी) सोपविण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्राला १० हजार याप्रमाणे ४० लाख ८० हजार रुपयांचा निधी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातून गटशिक्षणाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आला.
परंतु, अभियान सुरू होऊन आठ दिवस उलटल्यावरही उपक्रमांच्या नावाने बोंब आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभाग आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडूनही (डायट) या उदासीनतेबाबत कोणत्याच शाळेला, यूआरसी केंद्राला जाब विचारण्यात आलेला नाही.