विक्रमी मोहर येऊनही यंदा ४० टक्के आंबा कमीच; हवामान बदलाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 09:07 AM2022-04-26T09:07:07+5:302022-04-26T09:07:18+5:30
हवामान बदलाने काळवंडला आंबा; चढ्या दरानेच करावी लागणार खरेदी
मनोज गडनीस
मुंबई : झपाट्याने होणारे वातावरणीय बदल आणि विविध कीटकांचे हल्ले याचे ग्रहण आंबा उत्पादनाला लागले असून, यंदा विक्रमी मोहर येऊनही आंब्याचे उत्पादन मात्र ४० टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे आंबा उत्पादक, व्यापारी तर हवालदिल झाले आहेतच, पण दुसरीकडे आंब्याची आवकच घटल्यामुळे ग्राहकांना चढ्या दरानेच आंबे खरेदी करावे लागतील.
प्रसिद्ध हापूस आंब्याचे उत्पादन २०११ पासून सातत्याने घटताना दिसत असून, यंदाच्यावर्षी याच्या उत्पादनात तब्बल ४० टक्के घट होण्याची चिन्हे आहेत. देसाई बंधू आंबेवाले कंपनीच्या आनंद देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यंदा जानेवारीत विक्रमी मोहर आला होता. मात्र, त्यानंतर कोणत्याही औषधाला फारसा प्रतिसाद न देणाऱ्या ‘थ्रीप्स’ नावाच्या कीटकाने मोहरावर हल्ला करत त्यातील रस शोषून घेतला. यामुळे फळधारणा नीटशी झालीच नाही. सारखा पाऊस, सारखी थंडी आणि सारखे ऊन, अशा अनियमित ऋतुचक्रामुळे आंब्याला एक विशिष्ट बुरशी लागते आणि आंबा आतून कुजत जातो. दरम्यान, उत्पादकांसारखाच फटका वितरकांनाही बसत आहे. आंब्यामधे प्रचंड अस्थिरता असून आवकही अनियमित आहे. ३० टक्के अर्थात १२ पैकी ४ आंबे खराब लागत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर जाळी सापडत असल्याची माहिती ग्रो ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन विद्यासागर यांनी दिली. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर आंब्याच्या किमती कमी होताना दिसतात. यंदा मात्र दर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
यंदाची स्थिती काय?
दरवर्षी गुढीपाडव्याला वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या एक लाख पेट्या येतात. यंदा मात्र अवघ्या २१ हजार पेट्याच आल्या.
अक्षय्य तृतीयेला दीड लाख पेट्या वाशी मार्केटला येतात. यंदा जेमतेम ५० हजार पेट्या येण्याचा अंदाज आहे.
यंदा थंडीमुळे मोहर छान आला होता. पण वातावरणात प्रचंड बदल होत गेले. दिवसा ३० अंश सेल्सिअस तर रात्री २० अंश सेल्सिअस, इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल होतात. होळीनंतर १५ दिवस मळभ होते, अशा बदलांमुळे फळधारणा नीट होत नाही आणि उत्पादनही घटत आहे. - नीलेश पटवर्धन, श्रीकृष्ण मँगो
सरत्या दहा वर्षांत नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदलांचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून उत्पादन घटत आहे. - आनंद देसाई, देसाई बंधू आंबेवाले